नवी दिल्ली, दि. 25 : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 रोजी निवडणूक होणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम…
महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26 मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 26 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल आणि सायंकाळी 5 वाजता मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
*****
रितेश भुयार /वृत विशेष क्र.42 / दि.25.02.2020