सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल रमेश बैस

0
3

मुंबई, दि. १ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निसार तांबोळी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, माहिती महासंचालक जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन ध्वजाला मानवंदना दिली. सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी आपल्या भाषणात जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केल्याचा त्यांनी उल्लेख केला.

राज्यपाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासन करीत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, कोविडनंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. स्टार्टअप आणि इको सिस्टीम वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविडच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करीत महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केल्याचे सांगून राज्यातील जनतेने आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना शासनामार्फत विविध विभागांमध्ये 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून याअंतर्गत राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी 18 हजार 331 शिपाई भरती प्रक्रियाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल म्हणाले, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक 1.50 लाख रूपयांवरुन पाच लाख रूपये करण्यात आली आहे. याशिवाय नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे. राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. मुंबईतील जी.टी. रुग्णालयात तृतीयपंथासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. 45 विविध उद्योग आणि उद्योग समूह यांच्यासमवेत करार करुन एक लाख 25 हजार रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान 500 युवकांना पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येणार आहे. मागील वर्षी मनरेगा मध्ये 36.32 लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी शासनाने विकासाची पंचसूत्री ठरविली आहे. जी-20 परिषदेच्या बैठका महाराष्ट्रातही होत असून यात सहभागी प्रतिनिधींनी परिषदेचे कौतुक केले आहे. समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यान 521 किलोमीटरचा रस्ता वाहतुकीस खुला झाला असून आतापर्यंत या महामार्गाचा 10 लाखांहून अधिक वाहनांनी वापर केला आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असल्याचे सांगून राज्यपालांनी सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सुद्धा आता मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत केंद्राप्रमाणेच राज्यशासनही प्रती शेतकरी सहा हजार रुपये देणार असल्याने दरवर्षी 12 हजार रूपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विमाहप्त्याची दोन टक्के रक्कम आता शासनामार्फत भरली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून नोंदणी करता येईल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानाचा लाभ सुमारे 14 लाखांहून शेतकऱ्यांना मिळत आहे.

शासनामार्फत प्रकल्पबाधित मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले असून पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांसाठी पाच लाख रूपयांची विमाछत्राची योजना राबविण्यात येणार आहे. एक कोटी 63 लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ संचाचे फक्त 100 रुपये इतक्या माफक दराने वितरण केले आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर रोख 75 हजार रूपये देण्यात येणार आहेत. महिलांना बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. महिलांना घर खरेदीमध्ये मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्यात आली आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास तसेच 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधील प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यासह अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचे राज्यपाल म्हणाले.

दिव्यांगांचे संरक्षण, पुनर्वसन, रोजगार आणि स्वयंरोजगार याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत वाढ केली आहे. आता सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 20 लाख रूपये दिले जाणार आहेत. नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे रेती धोरण तयार करण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. अमरावतीच्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास आर्थिक साहाय्याच्या रकमेतही 15 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.

मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक), बृहन्मुंबई अग्निशमन दल वाहने (आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर) यांनी सहभाग घेतला.

नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र

राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन सेवेत नवनियुक्त उमेदवारास नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यामध्ये तुषार संभाजी गवारी, गौरव उत्तम शिंदे, आशिष विठ्ठल दराडे, श्रीमती हेमिती विजय सावंत, श्रीमती वैशाली विजय यादव आणि श्रीमती आरती सदानंद तांदळे, श्रीमती पूजा दत्तात्रय दाभाडे, राहुल सत्यवान शिंदे, योगेश अशोक चव्हाण, प्रणव मोठाभाऊ भामरे यांचा समावेश होता.

चित्ररथ स्पर्धेचे निकाल जाहीर

प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या सोहळ्यात एकूण 16 चित्ररथांचे सादरीकरण झाले होते. यामधून कृषी विभागाच्या चित्ररथाने प्रथम, सांस्कृतिक कार्य विभागाने द्वितीय तर गृह विभागाच्या (वाहतूक) चित्ररथाने तृतीय क्रमांक मिळवल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव मिलिंद हरदास, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, श्रीधर देशमुख, भरत जैत आणि त्यांच्या पथकाने केले. सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर आणि शिबानी जोशी यांनी केले. किरण शिंदे, अरूण शिंदे, विवेक शिंदे यांच्या पथकाने सनई चौघडा वादनाने तर पांडुरंग गुरव यांच्या पथकाने तुतारी वादनाने कार्यक्रमाची सुरूवात केली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here