गरिबांसाठी आपला दवाखाना उपयुक्त ठरेल – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
34

यवतमाळ, दि २ मे:- गरीब, कामगार, मध्यमवर्गीय जनता सकाळीच कामाला निघून जातात. त्यामुळे अशा लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबुन  रहावे लागते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशाच नागरिकांसाठी दुपारी २  ते रात्री १० या वेळेत सुरु राहाणार असून कामगार, मजूर अशांसाठी  हा दवाखाना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे काल कामगार दिनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन भोसा येथे करण्यात आले.  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड,  उपवनसंरक्षक श्री धनंजय , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर डी राठोड उपस्थित होते.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यांची कामावर जाण्याची वेळ सकाळची असल्यामुळे या लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबून राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत आपला दवाखान्याचा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले. त्याचवेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला दवाखाना सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर आज आपला दवाखाना जिल्ह्यात सुरू झालेला आहे. आज त्याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद झाल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण ३७  दवाखाने उघडणार असून पैकी बारा आज सुरू झालेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा सुविधा आणि औषधे मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना आरोग्य विभागाने प्रत्यक्षात पुढे न्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गरीब लोकांना साध्या बाह्य रुग्ण सेवेसाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते. तिथे तज्ञ डॉक्टरांची व्यवस्था नसते तरीही त्याचा आर्थिक भार शहरी भागातील गरीब लोकांना बसतो. आपला दावाखान्याच्या माध्यमातून ही व्यवस्था आता बदलता येईल. लोकवस्ती जास्त असणाऱ्या ठिकाणीच आपला दवाखाना सुरू होणार आहे. त्यामुळे  गरीब लोकांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्यासाठी होणारा खर्च आपल्याला आपल्या उत्तम आणि चांगले सेवेच्या माध्यमातून टाळता येईल. आपली सेवा चांगली राहील याचा आपण कसोशीने प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

सुरुवातीलाच योग्य निदान व उपचार मिळाल्यास अनेक आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापासून वाचू शकतात.  आपल्याकडे आरोग्य क्षेत्रातील या मिसिंग लिंक आपला दवाखानाच्या माध्यमातून दूर होतील अशी आशा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केली.  महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण आपल्या देशात मोठे आहे आणि यामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. जर ह्या कर्करोगाचे प्रारंभीच योग्य निदान होऊन उपचार मिळाले तर कर्करोग गंभीर स्वरूप घेण्यापासून टाळता येऊ शकतो.  त्यामुळे ह्या मिसिंग लिंक या दवाखान्यामुळे पूर्ण होतील. तसेच कामगारांना आपला दवाखाना उपयुक्त राहील. सर्व सेवा सुविधा या दवाखान्यात नि:शुल्क आहेत. त्यामुळे  शहरी भागातील नागरिकांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तन्वीर शेख, डॉ. प्रीति दुधे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतिकुमार नावंदीकर,डॉ. संजना लाल वैद्यकीय अधिकारी, डॉ.नाझिया काझी वैद्यकीय अधिकारी, लव जेठवा, डॉ. प्रमोद लोणारे, व नागरी आरोग्य केंद्र 1,2,3, येथील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत पांटील यांनी केले

काय असणार आपला दवाखान्यात

बाह्य रुग्ण सेवा, मोफत उपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चसािवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण इत्यादी.

गरजेनुसार ७ तज्ञ सेवा

फिजिशियन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ , मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ.

उपलब्ध अधिकारी/ कर्मचारी

वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स बहुउद्देशीय कर्मचारी आणि मदतनीस एवढे केंद्रात सेवा देण्यासाठी नियुक्त राहतील.

००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here