दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

0
3

मुंबई, दि. 21 : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा वेळापत्रकानुसार दि.3 मार्च ते दि.23 मार्च 2020 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.

त्यातील दि.21 मार्च 2020 अखेरची लेखी परीक्षा झालेली आहे. मात्र राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याबाबत खबरदारी घेण्यासाठी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना दि.31 मार्च, 2020 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांनी जाहिर केल्यानुसार सोमवार दि.23 मार्च 2020 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 यावेळी आयोजित करण्यात आलेली सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा व त्यापुढील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशिक्षण विषयांची परीक्षा, आऊट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत.

परीक्षांबाबतचे सुधारित नियोजन मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here