समाजाने दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

0
2

मुंबई, दि. १८ : समाजात अनेक प्रकारचे दिव्यांग व्यक्ती उत्कृष्ट काम करीत आहेत. अशा व्यक्तींना निसर्गाकडून दिव्य गुणांचे सहावे ज्ञानेंद्रिय असते. समाजाने दिव्यांग व्यक्तीमधील दिव्य गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

दिव्यांग व्यक्तींच्या व्यावसायिक कौशल्याच्या ऑलिम्पिक असलेल्या यंदाच्या १० व्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग अॅबलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक प्राप्त करणाऱ्या ४ दिव्यांग युवक व युवतींचा राज्यपाल रमेश बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १८) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे येथील बालकल्याण संस्थेच्या वतीने या दिव्यांग पदक विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वतंत्रपणे व सन्मानाने जीवन जगू शकेल हे पाहणे समाजाचे कर्तव्य आहे, असे सांगून आज तंत्रज्ञान तसेच बालकल्याण सारख्या सेवाभावी संस्थांमुळे अपंगत्वावर बऱ्याच प्रमाणात मात करता येते असे राज्यपालांनी सांगितले.

आपण समाज कल्याण व सक्षमीकरण संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयक तयार केले होते याचे स्मरण देऊन दिव्यांगांना सन्मानाने जगण्यास आपण यापुढेही शक्य तितके प्रयत्न करू असे राज्यपालांनी सांगितले.

बालकल्याण संस्थेच्या कार्याचे तसेच अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी संस्थेला भेट देण्याचे मान्य केले.

सन १९७८ साली बालकल्याण संस्था पुणे येथील राजभवन परिसरात सुरु करण्यात आली व आजवर ५००० दिव्यांग विद्यार्थी व युवकांनी संस्थेतील सुविधांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती प्रतापराव पवार यांनी दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालकल्याण सारख्या सुविधा देशात कोठेही नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते चेतन पाशिलकर (पेंटिंग व वेस्ट रियुज मधील सुवर्ण पदक), प्रियांका दबडे (एम्ब्रॉयडरी), भाग्यश्री नडीमेटला-कन्ना (टेलरिंग) व ओंकार देवरुखकर (पोस्टर डिझायनिंग ऑन कम्प्युटर) या दिव्यांग विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे यांनी संस्थेच्या आजवरच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

दिनांक २३ ते २५ मार्च या कालावधीत फ्रान्स येथे या आंतरराष्ट्रीय ऍबलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here