‘शासन आपल्या दारी’ राज्यात क्रांती आणणारा कार्यक्रम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
5

सिंधुदुर्गनगरी दि. ६ (जि.मा.का) :- ‘शासन आपल्या दारी’  या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात क्रांती आणणारा हा कार्यक्रम ठरेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कुठेही मागे हटणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ चा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज कुडाळ येथे झाला. या प्रसंगी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार भारत गोगावले, रविंद्र फाटक, नितेश राणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी, ‘माका ही गर्दी बघून खूप आनंद झालो. कसे असात… बरे असात ना…’ अशी मालवणी बोलीतून आपल्या भाषणाची सुरुवात करुन उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, कोकणी माणूस बाहेरुन फणसासारखा व आतून  गोड गऱ्या सारखा असतो. शासन आणि लाभार्थी यातील अंतर मिटवून टाकण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ याची सुरुवात पाटण येथून झाली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतोय. एकाच छताखाली लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सर्वसामान्य लोकांना सरकार दरबारी चकरा माराव्या लागता कामा नयेत, अशा पध्दतीने राज्य कारभार केला पाहीजे. त्याच धर्तीवर शासन काम करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांसाठी ६७९ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारत बांधकाम, मौजे मिठबांव- गजबा देवी मंदिर परिसर, सिंधुरत्न समृध्द योजना, बॅ. नाथ पै स्मारक यांचा समावेश आहे.

पहिल्या कॅबिनेटपासून लोकाभिमुख निर्णय घेतले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, तरुण ज्येष्ठ नागरिक यांचं काहीतरी देणं लागतय म्हणूनच तुमच्या दारापर्यंत सरकार येवून तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याच्या अनेक योजनांना केंद्राचे शंभर टक्के पाठबळ मिळत आहे. ७ टीएमसी पाणी समुद्राला वाहून जाते. त्या प्रकल्पालाही निधी लागणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करीत आहोत. निश्चितच कोकणाला पाठबळ मिळेल. कोकण विकास प्राधिकरणाचा निर्णय घेतला आहे. कोकणातला विकासाचा अनुशेष भरुन काढतोय. नोकरी, रोजगारांच्या माध्यमातून कोकण समृध्द करायचा आहे. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प शासनाने घ्यायचे, असा निर्णय घेतला आहे. एलएनजीच्या माध्यमातून वातानुकुलित एसटी केल्या जातील.

सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. विकास असा झाला पाहिजे की, जगाला हेवा वाटला पाहीजे, असा संकल्प करुया, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थीना प्रातिनिधिक स्वरुपात  शासन योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र, वाहनांच्या चाव्या, धनादेश वितरीत करण्यात आले.

केंद्रीयमंत्री श्री. राणे म्हणाले, पायाभूत सुविधा, आरोग्य, साधनं, व्यवसाय-नोकरी, कोणत्या क्षेत्राची आवश्यकता आहे. हे विचारण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वत: आले आहेत. जिल्ह्याला २०० कोटीचं प्रशिक्षण केंद्र दिलं आहे. त्याचे महिन्याभरात काम सुरु होईल. या सेंटरच्या जागेसाठी १३ कोटीचे शुल्क मुख्यमंत्र्यांनी माफ करुन लवकर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. कोकणी माणसांची मुले आज नोकरीसाठी परदेशी जात आहेत. यातून जिल्ह्याची प्रगती दिसून येते. राज्याच्या तिजोरीत भर टाकणारा जिल्हा आहे. आणखी रोजगार वाढल्यास उत्पन्न वाढेल पर्यांयाने जीडीपी वाढेल. कोकणात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे.

पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचे सरकार एकाच छताखाली लाभ देवू शकते, याचं उदाहरण ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाने दाखवून दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून शासन योजनेचा थेट लाभ लाभार्थीना मिळत आहे. १९ रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण लवकरच करण्यात येणार आहे. येथील स्थलांतर थांबण्यासाठी पर्यटन जिल्ह्यातील युवकाला काम मिळाले पाहीजे. त्यासाठी पर्यटन पॅकेज जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यात विकास कामांची घोडदौड सुरू आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास करताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधे ५० टक्के सवलत देवून राज्य शासनाने महिलांना सन्मान दिला आहे. तर ७५ वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना एस. टी. प्रवास मोफत केला असल्याचे ते म्हणाले.

शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून  राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून योजना सर्व सामान्यांच्या दारी पोहचविण्यात येत आहेत. शासन योजनांचा लाभ देण्याच्या माध्यमातून शासन लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे,  हे या उपक्रमाचे यश आहे, असे ते म्हणाले. येथून जाताना आपल्या योजनांचा लाभ जाताना घेवून जाल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रास्ताविकात विविध योजनांमधून देण्यात येत असलेल्या लाभाची माहिती दिली. प्रारंभी मुख्यमंत्री राज्य जन कल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी योजनादूत आणि शासन आपल्या दारी बाबत माहिती दिली. शेवटी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आभार मानले.

०००००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here