यंदा जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
7

ठाणे, दि. 14 (जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी संबंधित जिल्हा परिषद व महापालिकांनी दक्षता घ्यावी. आवश्यकता भासल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या विविध यंत्रणांचा आढावा तसेच शासन आपल्या दारी, पाणी पुरवठा, शहरांमधील नालेसफाई व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गतच्या तयारीचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंग, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई महापालिका आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनांच्या निधीचा विनियोग व पुढील काळातील नियोजन, आपत्ती काळात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांची निवड आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

श्री. देसाई म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला गेल्या वर्षीपेक्षा यंदा 132 कोटी रुपये जास्तीचे मिळाले आहेत. पुढील काळात संभाव्य निवडणुका पाहता हा निधी यंदा डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी 15 जुलैपर्यंत संबंधित यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कामाचे अंदाजपत्रके लवकरात लवकर द्यावेत. यंदाच्या वार्षिक योजनेचा निधी वेळेत व शंभर टक्के खर्च होईल यासाठी नियोजन करावे. हे करत असताना कामे दर्जेदार होतील याकडेही लक्ष द्यावे.

महिलांचे सक्षमीकरणावर मा. मुख्यमंत्री महोदयांनी भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला बचत गटांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. ज्या महिला अद्याप बचत गटात नाहीत, त्यांना बचत गटात समावेश करून घ्यावे. तसेच असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष यंत्रणा उभारावी, असे निर्देशही पालकमंत्री महोदयांनी दिले.

पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना पर्यायी जागेत स्थलांतरित करून ती इमारत निष्कासित करण्याची कार्यवाही तातडीने करावी. यासाठी गरज पडल्यास पोलीस यंत्रणांनी मदत करावी. तसेच नाले सफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, विद्युत वाहिन्यांवरील झाडांचे फांद्या कापणे ही कामे तातडीने पूर्ण करावीत. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ते बंद पडणे, वाहतूक कोंडी होणे या घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करावे. तसेच अशा घटना घडल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, असेही निर्देश श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

शासन आपल्या दारी या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात या उपक्रमाअंतर्गत 3 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी नियोजन करावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठकही यावेळी झाली. जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांची संख्या वाढवावी. तसेच नवीन दुकाने वाटप करताना महिला बचत गटांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी वार्षिक योजनेच्या निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2022-23 या वर्षासाठी 618 कोटी नियतव्य मंजूर झाला होता. हा संपूर्ण निधी खर्च झाला आहे. यंदा सन 2023-24 साठी 750 कोटीचा नियतव्य मंजूर झाला असून गेल्या वर्षीपेक्षा 132 कोटी वाढीव मिळाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या योजना, आरोग्य सुविधा, नगरपालिका क्षेत्र, शाळा दुरुस्ती, महिला व बालकल्याण, पोलीस यंत्रणा, गतिमान प्रशासन यासाठी वाढीव निधी मंजूर झाला आहे. तसेच यंदा नव्याने गड किल्ले संवर्धनासाठी जिल्ह्यास 16 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप

राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम व अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी योजनेची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here