सांगली दि. 16 (जि.मा.का.) :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस दलाने याबाबत अधिक दक्षता घेतली पाहिजे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.
पोलीस मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, विटा व तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सतीश कदम उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घ्यावी. गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण झाली पाहिजे यासाठी कोणताही मुलाहिजा न ठेवता कडक कारवाई करण्यात यावी. नशेखोर लोकांवर कारवाई केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी सांगितले.
अवैध धंदे बंद झाल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकेल, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, गुन्हे का घडतात याचीही उकल होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून खुनाचे प्रमाण वाढले आहे ही चिंतेची बाब आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जनतेला असुरक्षितता वाटू नये यासाठी पोलीस दलाने अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटी स्थापन करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.