कौंडण्यपूर विकास आराखड्यातील कामांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, दि. 16 : तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर विकास आराखड्यातील प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

           श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे भेट देऊन विभागीय आयुक्तांनी विकास आराखड्यांतर्गत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, तसेच आढावा आज घेतला. त्यांनी जिल्हाधिका-यांशीही चर्चा करून उर्वरित कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. तहसीलदार वैभव फरताडे व कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

               विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, कौंडण्यपूर विकास आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मंदिर परिसरातील भक्त निवास, तसेच वाहनतळ, नदी घाट व इतर स्थापत्य कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी याबाबत आढावा बैठकही लवकरच घेतली जाईल. याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांशी चर्चा करून कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.

          कौंडण्यूपर येथील हे प्राचीन तीर्थस्थळ आहे. त्यामुळे येथील विकास आराखड्यातील कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले.