शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आदिवासी विकास मंत्री ना. डॉ विजयकुमार गावित

0
9

धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी समाजातील मुलांचे शिक्षण थांबू नये याकरिता शालेय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच आश्रमशाळा इमारतीसाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत साक्री तालुक्यातील साक्री, सुकापूर, वार्सा येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी पवार, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार श्रीमती आशाताई गांगुर्डे, गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ना. डॉ. गावित म्हणाले, आश्रमशाळा व वतीगृहातील विद्यार्थ्यांच्या संगोपन, जेवण, संरक्षण यासाठी रोजंदारी तत्वावरील कार्यरत 52 वर्ग चारचे कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. शासकीय वसतिगृह इमारतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर राहण्याची व्यवस्था सुध्दा चांगली होणार आहे. मुलांनी स्वत:हुन शिक्षणाची गोडी अंगीकारली पाहिजे. शासकीय सवलतीच्या लाभाबरोबरच शिक्षणाकडेही लक्ष दिले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना शाळा सुरु असतांना वारंवार घरी घेऊन जाणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊन शिक्षणात खंड पडल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. गावीत म्हणाले शासकीय आश्रम शाळा, वार्सा या शाळेचा निकाल सलग पाच वर्ष 100 टक्के लागत आहे ही आनंददायी बाब आहे. याबद्दल त्यांनी शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांचे कौतून केले. तसेच 10 व 12 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पार पडलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वार्सा या शाळेतील 12 मुले व 16 मुली असे एकूण 28 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून 24 खेळाडू राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत वैयक्तिक खेळातही सहा विद्यार्थ्यींनीनी यश मिळविले आहे. त्या विद्यार्थ्यांना ना. गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी केले. या कार्यक्रमास संबंधित गावचे लोकप्रतिनधी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here