हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

0
7

नागपूर, दि. 21 : काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसोबत संवाद साधत दिला.

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अपघात रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आज श्री. भुसे यांनी प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर जाऊन घेतला. त्यानंतर त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.

समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या शहरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. मात्र, गेल्या काही दिवसात या महामार्गावर झालेले अपघात लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी प्रवाशांनीही नियमांचे पालन करीत प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. भुसे यांनी समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट तसेच वायफळ टोलनाक्याची पाहणी करीत दौ-याला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी समृद्धी महामार्गाची माहिती मंत्री श्री. भुसे यांना दिली. यात कंट्रोल रुम, वाहनाला आग लागल्यास आग प्रतिबंधात्मक सयंत्र, शीघ्र कृती दल वाहन, वाहनांची टोलनाक्यावर करण्यात येणारी तपासणी, प्रवाशांसाठीचे समुपदेशन केंद्र, ॲम्ब्युल्सची पाहणी केली. यावेळी मंत्रीमहोदयांना आग्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या महामार्गावर अपघात झाल्यास प्रतिसाद देणारी ॲम्बुलन्स 15 मिनिटाच्या आत पोहोचते. हा कमाल कालावधी आणखी 10 ते 12 मिनिटावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांसोबत मंत्री श्री. भुसे यांनी संवाद साधला. कोल्हापूर येथून आलेल्या बाजीराव गवळी व त्यांच्या कुटुंबीयांसोबत मंत्रिमहोदयांनी समृद्धी महामार्गावरील प्रवासाचा अनुभव जाणून घेतला. समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना निश्चित वेगमर्यादा पाळण्याची गरज आहे. नियम पाळणाऱ्यांना धोका नाही. नागपूरपर्यंतचा प्रवास सुखकर झाल्याची प्रतिक्रिया श्री. गवळी यांनी मंत्रिमहोदयांसमोर दिली.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहव्यवस्थापकीय संचालक ए.बी.गायकवाड, संजय यादव, एस.एस.मुरडे, महाव्यवस्थापक भारत बास्तेवाड यांच्यासह परिवहन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ओव्हरस्पीड’मध्ये जाणाऱ्या चालकाचे समुपदेशन

महामार्गावर 120 गतीमर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ही गती ओलांडणाऱ्यांना थांबवून त्यांचे टोल नाक्यांवर समुपदेशन करण्यात येते. मंत्री महोदयांच्या दौऱ्यादरम्यान एका वाहन चालकाचे समुपदेशन सुरु होते. मंत्र्यांनी या चालकाला गती मर्यादा पाळण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here