मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दिशा देणारा अर्थसंकल्प – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

0
12

मुंबई, दि. 6 : राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा आणि महसूली तुटीच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करुन विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करणे एक आव्हान होते.त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प सामान्य माणसाला अपेक्षित असलेला असा हा अर्थसंकल्प असून मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी राज्याला दिशा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

श्री. भुजबळ म्हणाले, शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी एक लाख याप्रमाणे पुढील पाच वर्षात पाच लाख सौर कृषिपंप बसविण्यासाठी नवीन योजना, कोकण विभागातील काजू या नगदी पिकावरील प्रक्रियेला चालना देण्याकरिता 15 कोटी रुपयांचा विशेष निधीची घोषणा. ठिबक सिंचन बसविण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व बहुभूधारक शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देण्याची योजना संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे. साखर कारखान्यांना सहभागी करुन घेत ऊस लागवडीखालील शेती पुढील तीन वर्षात पूर्णपणे ठिबक सिंचनाखाली आणली जाणार असून शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरु केली जाणार आहे. सहकार, पणन, वस्त्रोद्योग या विभागास 7 हजार 995 कोटी निधीचा तरतूद करण्यात आली आहे.

केंद्राच्या निधीची वाट न बघता राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार असून महिला व बालकल्याण विभागाला विशेष निधी दिला आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य दिले असून पायाभूत सुविधांना भरीव मदत केली आहे. कुठलेही सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारने मांडलेला पहिला अर्थसंकल्प हा राज्याच्या पुढील पाच वर्षाची वाटचाल अधोरेखित करत असतो. त्यादृष्टीने महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अर्थमंत्री  अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प आर्थिक संकटात सापडलेल्या राज्याला पुन्हा एकदा उभारी देईल असा विश्वास आहे

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अटी शर्ती न घालता सरकारने कर्जमाफी दिली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी22 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या खर्चातून मदत केली. राज्यात दररोज रोज एक लाख शिवभोजन थाळी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. 

शिवभोजन थाळी केंद्रावर500 पर्यंत थाळी देणार आहोत. शिवभोजन थाळीसाठी 150 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत पायाभूत सुविधा व कृषि क्षेत्राला प्राधान्य आणि शिक्षण,आरोग्य,महिला सुरक्षा आदी क्षेत्राचा विचार करून  सामाजिक भान जपणारा तसेच राज्यातील 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याने खऱ्या अर्थाने राज्यातील शेतकरी, महिला, गोरगरीब आणि तरुणांची अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/6.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here