राज्यातील सहा जण निरीक्षणाखाली; १४९ प्रवासी कोरोना निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0
9

मुंबई, दि. ३ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सहा जण निरीक्षणाखाली असून १४६ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  ५५१ विमानांमधील  ६५ हजार ६२१ प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत ४०१ प्रवासी आले आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी  १४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने’कोरोना‘करिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर ३ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या १५२ प्रवाशांपैकी १४६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या  ४ जण मुंबईत तर  २ जण पुणे येथे भरती आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुढील सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे –

o     वुहानमधून (चीन ) आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

o     इतर  बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.

o     बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.

o     या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते.

o     याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळविण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे.

o     या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

– अजय जाधव..३.३.२०२०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here