सारथी संस्थेच्या कामकाजातील अनियमितता : दोषींवर कारवाई करणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 3 : सारथी संस्थेच्या कामकाजात झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल १०दिवसात येईल. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले. त्याचबरोबर या संस्थेची स्वायत्तता कायम राखण्याबरोबरच संस्थेचे सक्षमीकरण आणि त्यामार्फत मराठा विद्यार्थी आणि तरुणांसाठीच्या विविध योजना प्रभावी पद्धतीने राबविल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभेत सदस्य वैभव नाईक, महेंद्र थोरवे, मंगेश कुडाळकर आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

सारथी‘मधील अनियमिततेच्या प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांवर आरोप झाले आहेत. तपासणीसाठी सचिव किशोरराजे निंबाळकर यांची समिती नेमली होती. आता अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल १० दिवसात प्राप्त होईल. अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तथापि, या अनियमिततेमध्ये तत्कालीन इतर संचालकांचा काहीही दोष नाही, त्यामुळे त्यांच्या चौकशीचा विषय नाही, असेही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.   

मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, ‘सारथीमार्फत मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती तथा मानधनाचा दुसरा हप्ता वितरीत केला जाईल. यूपीएससी, स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांच्या अभ्यासासाठी निवडलेल्या या विद्यार्थ्यांचे मानधन येत्या दहा दिवसात दिले जाईल. एकाही मराठी विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. संस्थेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

बार्टी आणि’सारथी‘च्या धर्तीवर ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्था सुरु करण्यात येत आहे. महाज्योतीच्या माध्यमातून वंचित ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही या सर्व योजना उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत आमदार रोहीत पवार, संजय कुटे, राहूल कुल, नितेश राणे आदींनी सहभाग घेतला.