कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

मुंबई, दि. 3 : विविध खाजगी आस्थापनांमध्ये  काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

कंपनी व्यवस्थापनानेदेखील  कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन श्री.कडू यांनी केले. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रिसिजन मेटल्स, नाशिक येथील ड्रिल बीट इंटरनॅशनल तसेच वडपे- भिवंडी येथील गोदरेज अँड बॉईस कंपनी लिमिटेड या आस्थापनांमधील कामगारांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री श्री.कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

    

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रिसिजन मेटल्स या कंपनीने बेकायदेशीरपणे काही कामगारांना कामावरून काढून टाकले आहे यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. कंपनीने कामगारांप्रती सहानुभूतीची भूमिका ठेवून, नोकरीवरून काढलेल्या कामगारांना पुन्हा नोकरीत कसे सामावून घेता येईल यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.नाशिक येथील ड्रिल बीट इंटरनॅशनल या कंपनीनेही काही कामगारांना कामावरून काढून टाकले आहे.कामावरून काढून टाकलेल्या 25 कामगारांना कंपनीने पुन्हा नोकरीवर घेण्याची तयारी यावेळी दर्शवली.उर्वरित कामगारांनाही कशा पद्धतीने नोकरीत सामावून घेता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.कामगार संघटनेने आपला संप मागे घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी केले. त्याला कामगार संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला.

वडपे – भिवंडी येथील गोदरेज अँड  बॉईस कंपनी या आस्थापनेवरील कामगारांच्या समस्यांबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी तसेच कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/3.3.2020