कुपोषणमुक्तीसाठीच्या टास्क फोर्सने उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

0
8

पालघर जिल्हा आढावा बैठक

मुंबई,दि. 3 :  आदिवासींमधील बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाकडून (टास्क फोर्स) आवश्यक उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या खाटांचा क्षमतेत वाढ तसेच श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करावी,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्हा आढावा बैठकीमध्ये दिले.

आरोग्य केंद्रातील रिक्त पदे

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालयांच्या सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी घेतला. यावेळी तेथील डॉक्टर,परिचारिका व अन्य रिक्त पदे त्वरित भरण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्य सुविधांचा आढावा घेताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,आरोग्य सेवा,शिक्षणासाठी कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) निधीतून तसेच अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे. वसई- विरार महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालये महानगरपालिकेला चालविण्यासाठी देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने तपासून कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

धरणाचे पाणी

जिल्ह्यातील सूर्या धरण,कवडस प्रकल्प,देहती प्रकल्प,लेंडी प्रकल्प आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या धरणांचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. त्यावर स्थानिकांना पिण्याचा पाण्याची टंचाई होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.ए नागरिकांना आवश्यक ते तात्पुरता निवाऱ्याच्या अनुषंगाने कापडी तंबू,ताडपत्र्या पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच मुंबई आयआयटी ने अभ्यास करुन येथे भूकंपांचे धक्के सहन करु शकतील अशी‘रेट्रोफीटिंग’घरे बांधण्याची शिफारस केली आहे. त्याबाबतही तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

रस्ता आराखडा

 तारापूर अणुशक्ती केंद्राच्या परिसरातून आणीबाणीच्या प्रसंगी जलद गतीने बाहेर पडता यावे यासाठी रस्त्यांचा आराखडता तयार करावा,असेही श्री. ठाकरे म्हणाले. या बैठकीत रस्ते,पूल,वसई-विरार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा,वीज उपकेंद्रे सुरू करणे,प्रादेशिक आराखडा आदींबाबतही चर्चा करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील आरोग्य,रस्ते,पाणीपुरवठा,  नगरविकास,जलसिंचन प्रकल्प,वीज आदी बाबींचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे,मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष,सर्व स्थानिक आमदार,सर्व संबंधित विभागांचे सचिव,कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड,पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार,लोकप्रतिनिधींनी मागण्या मांडल्या.

बैठकीस महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे,आमदार सर्वश्री रविंद्र फाटक,हितेंद्र ठाकूर,कॉ विनोद निकोले,सुनील भुसारा,श्रीनिवास वनगा,क्षितीज ठाकूर,राजेश पाटील,निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here