माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई दि. 2 : माथेरान नगरपरिषदेस पाणीपुरवठा करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये पंपिंग करावी लागत असल्याने विद्युत देयकावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. तसेच महावितरणने विद्युत दर वाढविल्याने त्यात अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळे माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी संदर्भात  पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली.

माथेरान येथील कुंभे, जुम्मापट्टी, वॉटरपाईप, शारलोट तलाव येथील पंपिंग स्टेशन चालविण्याकरिता दैनंदिन देखभाल दुरुस्ती खर्च अनिवार्य आहे. पर्यटन विभागामार्फत संबंधित योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु हा निधी कमी पडत असल्याने माथेरान नगरपरिषदेने ठराव मंजूर करून पर्यटन व नगरविकास विभागाकडे निधीची मागणी करावी, त्यानंतर पाणीपुरवठा, नगरविकास व पर्यटन विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी असेही निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आदी उपस्थित होते.

याच बैठकीत कर्जत व खालापूर तालुक्यातील आदिवासी  वाड्यांसाठी पाणीपुरवठा योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.