पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

मुंबई,दि.27 :-महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात‘महानंद’च्या टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत. मुंबई महापालिका,शालेय शिक्षण विभाग,आदिवासी विकास विभागाकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा,असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार,आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी,पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार,महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘महानंद’ही राज्य शासनाने स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेने दुधाचा दर्जा आणि व्यावसायिकता राखल्यास संस्थेस ऊर्जितावस्था येऊ शकते. शासकीय विभागांना आवश्यक दूधखरेदी  ‘महानंद’कडून करण्याबाबत धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात यावा,असेही बैठकीत ठरले.