शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेत हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपणाचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई,दि. २८ : राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नवीन आजारांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यामध्ये हृदय,यकृत,फुप्फुस प्रत्यारोपण,बोन मॅरो ट्रान्सप्लांट,कॉक्लिअर इम्प्लांट यांचा समावेश करण्यात आला आहे,अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी निवेदनात म्हटले आहे की,शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना आतापर्यंत २७ आकस्मिक व पाच गंभीर आजारांसाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देय आहे. तसेच आजारावरील खर्च भागविण्यासाठी अग्रीम देखील अनुज्ञेय आहे. या खर्च प्रतिपूर्तीसाठी आता नवीन आजारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या उपचारांपूर्वी २५ टक्के रक्कम कमाल मर्यादेच्या अधीन राहून अग्रीम मंजूर करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

उपचारांच्या कमाल मर्यादा अशा:

यकृत,हृदय,फुप्फुस प्रतिरोपण प्रत्येकी १५ लाख रुपये,हृदय व फुप्फुस प्रतिरोपण (एकत्र) २० लाख रुपये. बोन मॅरो ट्रान्सप्लांट ८ लाख रुपये. कॉक्लिअर इम्प्लांट ६ लाख रुपये.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०