जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात गठित समितीला 1 मेपर्यंत मुदतवाढ – शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 28- राज्यातील सर्व खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित अंशतः अनुदानित व तुकड्यांवर टप्पा अनुदानावर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला 1 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य विक्रम काळे यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्रीमती गायकवाड बोलत होत्या. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते. तर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर(20, 40, 60 आणि 80 टक्के) असलेल्या शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या शाळांना परिभाषित अंशदान योजना लागू होते. 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक व शिक्षकेतर वर्गातून करण्यात आली आहे. ही मागणी लक्षात घेता अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समिताचा अहवाल आल्यानंतर शिक्षक आमदार आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले, डॉ. सुधीर तांबे, नागो गाणार, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, भाई गिरकर यांनी भाग घेतला.
००००
नाशिक जिल्ह्यातील बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब
मुंबई, दि. 28 : नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या बसमधील प्रवाशांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर ऑटोरिक्षातील प्रवाशांना दोन लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कळवण आगाराच्या बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. परब बोलत होते. नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसचा 28 जानेवारीला ॲपे रिक्षाशी अपघात झाला होता. बसमधून एकूण 50 प्रवासी व चालक, वाहक 2 असे एकूण 52 व्यक्ती प्रवास करीत होते. त्यापैकी 16 प्रवासी व 1 चालक असे 17 व ॲपे रिक्षामधील 8 प्रवासी व 1 चालक असे एकूण 26 व्यक्ती मृत पावले होते. बसमधील मृत प्रवाशांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. तर ॲपेतील 9 मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये विशेष बाब म्हणून मदत देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले.
एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसेस नवीन आहेत. जुन्या बसेसचे इंजिन वापरून एकही जुनी बस नव्या शिवशाही बसच्या स्वरुपात वापरात नसल्याचे श्री. परब यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. लक्षवेधीवरील चर्चेत अनिकेत तटकरे, जयंत पाटील यांनी भाग घेतला.
००००
सिंधुदुर्गला मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 28 : कोकणातील विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्गला सुरू करण्यात येणार आहे. या उपकेंद्राला स्वतंत्र संचालक येत्या दोन महिन्यात नेमण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते. कोकण विद्यापीठासंदर्भात तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात समितीमध्ये प्राचार्य, पालकांचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काळात विद्यार्थी या सर्व प्रक्रियेचा केंद्रबिंदू असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही यात समावेश केला जाणार आहे. कोकण विद्यापीठाचा निर्णय हा विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा कल पाहून घेतला जाणार आहे. भविष्यात कोकण विद्यापीठाची निर्मिती झाल्यास या समितीमध्ये रायगडचा समावेश केला जाणार नाही. केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी येथील उपकेंद्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, जयंत पाटील, नागो गाणार, अनिकेत तटकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रकाश गजभिये, श्रीमती हुस्नबानो खलिफे यांनी भाग घेतला.
०००००
नवनिवार्चित सदस्यांचा परिचय
विधानपरिषदेमध्ये नवनिवार्चित सदस्य दुष्यंत चतुर्वेदी यांचा उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते अजित पवार यांनी परिचय करुन दिला.