‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक प्रदान समारंभ
मुंबई, दि. 27 : ‘लिहिता येणं हा दुर्मिळ गुण असून मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तो जोपासला पाहिजे. साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेले अनुभव रोजच निरनिराळ्या कामांतून आणि अभ्यागतांच्या भेटीतून येत असल्याने ‘आपलं मंत्रालय’च्या व्यासपीठावर ते अभिव्यक्त करावे’, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रकाशित करण्यात येत असलेल्या‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक (माहिती/प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माहिती/वृत्त) सुरेश वांदिले, संचालक (विशेष कार्य) शिवाजी मानकर, उपसंचालक अनिल आलूरकर उपस्थित होते.
मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी आपलं मंत्रालय हे हक्काचे व्यासपीठ आहे. या नियतकालिकाच्या वर्धापन दिनानिमित्त कथा, लेख, छायाचित्र, अनुभव व कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना सचिव डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तकांचा संच देऊन गौरवण्यात आले. यावेळी किरण शार्दूल यांना ‘पर्सन ऑफ द आपलं मंत्रालय 2019’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रास्ताविक श्री. वांदिले यांनी तर आभार प्रदर्शन श्री. आलूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुलकर्णी यांनी केले.
स्पर्धेतील विजेते :
कथा स्पर्धा :प्रथम – सुधीर वेदपाठक, द्वितीय – भरत लब्दे , तृतीय – मानसिंग उ. पाटील, चतुर्थ – सारिका निलेश चौधरी व पाचवा क्रमांक दिवाकर मोहिते.
लेख स्पर्धा :प्रथम – किरण शार्दूल, द्वितीय – सारिका निलेश चौधरी तर तृतीय क्रमांक अतुल नरहरी कुलकर्णी.
छायाचित्र स्पर्धा :प्रथम – दुर्गाप्रसाद मैलावरम, द्वितीय – प्रशांत वाघ, तृतीय – नंदकिशोर नीलम साटम, चतुर्थ – पंकज कुंभार तर पाचवा क्रमांक महादेव शांताराम मगर.
अनुभव स्पर्धा :प्रथम – किरण शार्दूल, द्वितीय – पद्मजा श्रीपाद पाठक, तृतीय – चित्रा धनंजय चांचड, चतुर्थ – महेश पांडुरंग पाटील तर पाचवा क्रमांक प्रियंका बापर्डेकर.
कविता स्पर्धा :प्रथम – सुरेश नाईक, द्वितीय – मानसिंग उ. पाटील, तृतीय – वृषाली सचिन चवाथे, चतुर्थ – संजीव केळुस्कर व पाचवा क्रमांक शैला जंगम.
‘आपलं मंत्रालय’चा अंक प्रकाशित
पारितोषिक वितरण समारंभादरम्यान ‘आपलं मंत्रालय’च्या फेब्रुवारीच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अनुभव, कविता, शुभवर्तमान व मंत्रालयातील घडामोडींचा यात समावेश करण्यात आला आहे.