‘इये मराठीचिये नगरी’ कार्यक्रमातून विधानमंडळात मराठीचा गजर
मुंबई दि.27 : मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची. या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीचा आवाज अजिबात केविलवाणा नसल्याचे आणि मराठीचा स्वाभिमान टिकविण्याचे काम आपणा सर्वांचे आहे असे स्पष्ट केले. एवढेच नाही तर मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वासही व्यक्त केला.
राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळात’इये मराठीचिये नगरी’या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास परिषदेचे सभापती रामराजे नाईक–निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, साहित्यिका नीलिमा गुंडी यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, विधानमंडळ सदस्य आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
मराठीचा आग्रह एक दिवसासाठी, एका वर्षासाठी नाही तर संपूर्ण आयुष्य मराठी, मराठी आणि मराठीच झालं पाहिजे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले ‘बये दार उघड’ असं सांगणारी भाषा मराठीच, प्रत्येक संकटात धावून येणारी मराठीच, मुगल आणि इंग्रजांना पुरुन उलेली भाषा आपली मराठीच आहे. त्यामुळे मराठी टिकेल की नाही याची चिंता नको.
आज आपल्या‘आई‘चा सन्मान
आज आपण सर्व मिळून आपल्या आईचा सन्मान करत असल्याची भावना व्यक्त करून श्री. ठाकरे म्हणाले, मराठी ही ह्दयावर, डोंगर कपारीत कोरली गेलेली भाषा आहे, आपण बोलत राहिलो तरी ती पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित होत जाईल. आपल्या भाषेचा एकच दिवस का साजरा करायचा, बरं करायचा तर मराठी भाषा टिकेल की नाही ही चिंता मनात बाळगून तो का साजरा करायचा ?
मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा
जगभरात साहित्य संमेलन, महोत्सवाच्या माध्यमातून मराठीचा जागर होत असताना मराठीची, मराठी संस्कृतीची ओळख आपल्या पुढच्या पिढीला करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा आहे. तिचा अभिमान, स्वाभिमान टिकवण्याचं काम आपल्या सर्वांचंच आहे. वासुदेव, नंदीबैलवाले, वाघ्या मुरळी या मराठीच्या सांस्कृतिक परंपरा पुढच्या पिढीला माहितीच नाहीत. मग मराठी भाषा पुढं जाणार कशी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी निकष आणि पुरावे मागितले जातात. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मराठी भाषेचा पुरावा मागणारे जिवंत असते का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मराठी भाषा अनिवार्य कायद्याचा आनंद
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा करण्याचं भाग्य मला मिळालं, याचा आनंद वाटत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद
मुख्यमंत्री सभागृहात भाषण करत असताना सभागृहाच्या गॅलरीत संत टेरेसा विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व चिमण्या पाहुण्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांना थेट संबोधित करून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या शाळेचे नाव विचारले. आज मला माझ्या आईची आठवण येते, तिने मला दगडी पाटीवर पेन्सिलने अ,आ,इ लिहायला शिकवले, तुमच्यापैकी कितीजणांना ही पाटी पेन्सिल माहित आहे असं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विचारताच हो माहिती आहे, असे जल्लोषपूर्ण उत्तर विद्यार्थ्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांकडून आजोबांचे स्मरण
आताचा माणूस मोबाईलवेडा झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मोबाईलमुळे लिहिणे, वाचणे बंद झाले. ऱ्हस्व, दीर्घ गेले. मराठी भाषा शुद्ध लिहिली गेली पाहिजे, ऱ्हस्व दीर्घाप्रमाणे भाषेचा उच्चार झाला पाहिजे हा आपल्या आजोबांचा प्रबोधनकार ठाकरे यांचा आग्रह होता असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रदर्शन
मुख्यमंत्र्यांनी विधानमंडळ प्रांगणात सुरुवातीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले तर ग्रंथ दिंडीची पालखीही मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी स्वत:च्या खांद्यावरुन वाहिली. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी विधानमंडळातील शिवप्रतिमेसही पुष्पहार अर्पण केला.
विधानमंडळात इये मराठीचिये नगरी कार्यक्रमातून मराठीचा गजर घुमला. यात गवळण, अभंग, भारुडासह मराठी भाषेचे वैभव सांगणारी गीते सादर करण्यात आली. मराठी भाषेचा, साहित्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला
मराठी भाषा संस्कृतीची वाहक होणे आवश्यक–नीलिमा गुंडी
मराठीची प्रवाहक्षमता गौरवास्पद असल्याचे सांगून साहित्यिका नीलिमा गुंडी म्हणाल्या, मराठी ही लोकव्यवहाराची भाषा होती. तिला ज्ञानभाषा करण्याचे काम तेराव्या शतकातील संतपरंपरेने केले. सांस्कृतिक ऊर्जा, प्रभावक्षमता ही मराठीची बलस्थाने आहेत. भारतीय भाषेत ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. असे असले, तरी भाषेचे चलनवलन वाढणे एवढे मराठीसाठी पुरेसे नाही. ती समाजाचा अंत:स्वर, संस्कृतीची वाहक होणे आवश्यक आहे. मराठी भाषा सक्तीची करून शासनाने यादृष्टीने खंबीर पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदनही केले. प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र मराठी भाषा विभाग असावा, मराठी बोलींचे जतन व्हावे, तसे अभ्यासक्रम तयार व्हावेत, भाषा प्रशिक्षक तयार व्हावेत, मराठी भाषेचे पायाभूत अभ्यासक्रम तयार व्हावेत, शासकीय पातळीवर मराठीचे सुसूत्रीकरण व्हावे अशा सूचनाही त्यांनी यानिमित्ताने केल्या.
मराठी भाषेसाठी भविष्यात संघर्ष- अजित पवार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी जुनी असून दुर्दैवाने अजून ती पूर्ण झाली नाही. मराठी माणसाला आणि मराठीला संघर्षाशिवाय काही मिळालं नाही, यासाठीही भविष्यात संघर्ष करावा लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मुलांनी, कुटुंबाने आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती जपली पाहिजे, आपल्या घरापासून याची सुरुवात झाली पाहिजे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, भाषेत पोट भरण्याची क्षमता असावी यादृष्टीने उद्योग, व्यापार आणि संगणकाची भाषा मराठी व्हावी. महाराष्ट्र कनार्टक सीमाबांधवांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. या निमित्ताने मी त्यांच्या साहित्य सेवेपुढे नतमस्तक होतो असेही श्री.पवार म्हणाले.
अभिजात भाषेसाठी पंधानमंत्र्यांची भेट-रामराजे निंबाळकर
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ घेऊन प्रधानमंत्री महोदयांची आपण सर्वजण भेट घेऊ, महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेची इच्छा पंतप्रधानांना सांगू असे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याकामी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सुचविले. जागतिक भाषेचे विद्यापीठ महाराष्ट्रात व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आज धड इंग्रजी नीट बोलू शकत नाहीत की मराठी अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बालकांनी या कार्यक्रमास वेळ दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
भाषेची आपुलकी आपणच दाखवली पाहिजे- नाना पटोले
मराठी आपणच बोलत नसू तर मराठी जगणार कशी? असा सवाल करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मराठी भाषेविषयीची आपुलकी आपणच दाखवली पाहिजे. मराठीचा जागर, मराठीची भूमिका देश आणि जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा संकल्प केला पाहिजे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण हा प्रयत्न जोरकसपणे करूया असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला. त्यांनी मराठी भाषेच्या गौरवासाठी अनेकांनी काम केल्याचे सांगून मराठी सक्तीच्या या कायद्यासाठी सर्वांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याचे म्हटले. स्व.हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी हा कायदा केल्याबद्दल मुख्यमंत्र्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती असेही त्या म्हणाल्या.