शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी विविध समित्यांचे होणार गठण; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

2
52

लोकशाही दिनाच्या धर्तीवर राज्यात आतामहिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिन !

मुंबई, दि. 21: शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत औपचारिक व्यवस्था नसल्यामुळे तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने शाळा, जिल्हा आणि विभागीय स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक शाळांमध्ये तक्रार पेटीही बसविण्यात येणार असून या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनाच्या धर्तीवर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

सध्या शाळेतील असुविधांपासून ते विविध प्रशासकीय कामांबाबत तक्रार निवारणासाठी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे अनेकदा ग्रामीण भागांतील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागत. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नसल्यामुळे अनेक समस्या वेळेत सोडविल्या जात नव्हत्या. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात यासाठी तक्रारी पेटीची योजना आखण्यात आली आहे. शाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश असलेली तक्रार निवारण समिती असेल. यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे, शिक्षकांच्या तक्रारींचे निराकारण करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती असून यात जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी कार्यरत असतील. तसेच विभागीय स्तरावर उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व संस्था यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळांचे अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपनिरीक्षक यांची एक समिती असणार आहे.

या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांनी केलेल्या गणवेश न मिळणे, कोणत्याही प्रकारचे शोषण, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचे तातडीने निराकारण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर संस्थाचालकही यात संस्थात्मक वादाबाबतच्या तक्रारी करू शकणार आहेत.

गुणपत्रिकेतील गुणांच्या तक्रारी तसेच इतर वाद या माध्यमातून सोडवले जाणार आहेत. तक्रारी करण्यासाठी दरवेळेस शिक्षण अधिकारी कार्यालयात न जाता त्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी ही यंत्रणा उभी करण्यात आल्याचे श्रीमती गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी विविध ठिकाणी शिक्षण दिनाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

2 COMMENTS

  1. प्रस्थापीत मराठीसह सर्व भाषिक शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून प्रथम भाषा इंग्रजीसह सेमी इंग्रजी लादल्याने
    हुकूमशाहीने गणित इंग्रजीतून शिकणे, शिकविणे कायमचे थांबवा.

  2. आपल्या देशात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (जम्मू आणि काश्मीर वगळून) १ एप्रिल २०१० पासून लागू असून त्यात कलम २९ (२) (च) नुसार ‘व्यवहार्य असेल तेथवर शिक्षणाचे माध्यम बालकाची मातृभाषा असेल;’ अशी तरतूद आहे. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम, २०११” तयार करून त्यातील भाग तीन – “राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची कर्तव्ये” मधील कलम ७ (क) ‘शासन किंवा स्थानिक प्राधिकरण, कोणत्याही बालकास कोणत्याही कारणास्तव शाळेत जाण्यापासून रोध होणार नाही आणि त्याला किंवा तिला आपले प्राथमिक शिक्षण भाषिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक भेदांमुळे पूर्ण करण्यात अडथळा येणार नाही याबद्दल खात्री करी” अशा स्पष्ट तरतुदी असताना देखील स्थानिक प्रशासनाकडून बालकांना मातृभाषेतून शिक्षणाची उपयुक्तता व हक्क असतांना अशास्त्रीय, असंवैधानिक, अक्षम्य, अनुचित व बोगस प्रकार सर्रास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here