विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शैक्षणिक संवादाचे आयोजन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0
8

मुंबई, दि. 20 : विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विभागानुसार शैक्षणिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच विद्यार्थांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात संबंधित विभांगांची एकत्र बैठक घेऊन तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालये यांच्यासाठी सुलभ होऊन त्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. तसेच यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आयोजित आढावा बैठकीत श्री.सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ अंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET), प्रवेश नियामक प्राधिकरण (ARA) आणि शुल्क नियामक प्राधिकरणाची (FRA) रचना करण्यात आली. या कायद्यांतर्गत ज्या सामाईक परीक्षा झाल्या त्यासाठी विद्यार्थ्यांकडून चुकीचा अर्ज, दोनवेळा अर्ज किंवा तांत्रिक अडचणींमुळे दोनवेळा शुल्क आकारणी केली गेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ते शुल्क परत करण्याचे निर्देशही यावेळी श्री.सामंत यांनी दिले.

श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेऊन शैक्षणिक धोरणं निश्चित केली पाहिजेत, विशेषतः विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करण्यासाठी संबंधित परीक्षा लक्षात घेऊन मार्गदर्शक आणि तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात येईल. तसेच सामाईक परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन अर्जप्रणाली सुलभ आणि सोपी बनवावी. शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत असताना विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची व्यवस्था तयार करून विशिष्ट वेळेच्या मर्यादेत विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश श्री.सामंत यांनी दिले.

यावेळी प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी. डांगे, आयुक्त संदीप कदम, संचालक कलाशिक्षण, राजीव मिश्रा, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालक डॉ.तात्याराव लहाने, तंत्रशिक्षण सह संचालक डॉ.सुभाष महाजन तसेच विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/20.2.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here