मुंबई, दि. 20 : राज्यात अर्थसहाय्यित, स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त या समितीच्या अध्यक्षपदी असून समितीवर इतर 6 सदस्य आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील युवक, युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता पोषक वातावरणनिर्मिती करण्यासाठी, त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन त्यांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात अर्थसहाय्यित तसेच स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीचे सदस्य म्हणून उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, विधी व न्याय विभागाचे प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु विजय खोले, मुंबई येथील एच.आर.कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉ. श्रीमती इंदु सहानी, वेलींगकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्चचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहसचिव डॉ. श्रीमती सुवर्णा खरात या सदस्य सचिव म्हणून समितीचे कामकाज पाहणार आहेत.
या विद्यापीठांच्या अधिनियमाचे प्रारुप तयार करणे, संस्थांमार्फत सुरु असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांना प्रमाणपत्र, पदविका, पदवी याबाबतची मान्यता देण्याबाबत अधिनियमामध्ये तरतूद करणे, अधिनियमांतर्गत स्थापन करावयाच्या अभिमत विद्यापीठांकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्तावांची शिफारस करण्याबाबत तरतूद करणे आदीबाबत समितीची कार्यकक्षा आहे. यासंदर्भातील अहवाल समितीने 15 दिवसात शासनास सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
००००
इर्शाद बागवान/विसंअ/दि.20.2.2020