नवी दिल्ली दि. 20 : दळणवळणाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून 15 हजार कोटी निधीचे अर्थसहाय्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिली.
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी झालेल्या चर्चेत श्री. चव्हाण यांनी ही माहिती दिली. एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून मिळणाऱ्या निधीमधून राज्यातील रस्ते विकासाची अनेक काम हाती घेतील जातील. यासाठी राज्यातील रस्ते विकासाचा निश्चित कार्यक्रम ठरवून अधिक रहदारी असणाऱ्या रस्त्यांचा विकास प्राथमिकतेने करण्यात येईल, अशी माहिती देत श्री. चव्हाण म्हणाले, राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे तसेच अधिक रहदारीच्या रस्त्यांना चिन्हीत केले जाईल. यामध्ये राज्यातील महामार्ग, इतर राज्यांना जोडणारे महामार्ग, जिल्ह्यांना, तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणारे रस्ते, तीर्थस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश असणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
‘दिल्ली डिरेक्टरी’ पुन: प्रकाशित व्हावी :अशोक चव्हाण
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने प्रकाशित होणारी ‘दिल्ली डिरेक्टरी’ वर्ष 2015 पासून प्रकाशित झालेली नाही. ती पुन : प्रकाशित व्हावी, यासाठी राज्यातील उद्योग तसेच मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी आज दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्र मागील 25 वर्षापासून दर दोन वर्षांनी ‘दिल्ली डिरेक्टरी’ प्रकाशित करीत असते. वर्ष 2015 पासून सदर डिरेक्टरी प्रकाशित झालेली नाही. या डिरेक्टरीमध्ये केंद्र तसेच राज्यशासनाच्या मंत्री, अधिकारी, कार्यालयाची इत्यंभूत माहिती असते. ही माहिती शासकीय स्तरावर अतिशय उपयोगी असून ती यावर्षापासून प्रकाशित व्हावी, याबाबत श्री. देसाई यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.