सहकार क्षेत्रात सामाजिक दायित्व महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते दि कल्याण जनता सहकारी बँकेचे समाजसेवा पुरस्कार प्रदान

ठाणे, दि. २९ : समाजाचे एक घटक या नात्याने आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. ही सामाजिक दायित्वाची भावना सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कल्याणच्या के.सी.गांधी सभागृहात दि कल्याण जनता सहकारी बँकेच्या न्यासाच्या वतीने देण्यात येणाऱ्या समाजसेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार कपिल पाटील, कोकण महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, न्यासाचे संचालक लक्ष्मीकांत उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात कार्यरत असतांना सामाजिक बांधिलकी जपणारे कृष्ण लाल धवण, भास्कर शेट्टी, महेश अग्रवाल यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ५१ हजार रुपये, ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कारार्थींनी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम संचालक न्यासाकडे सुपूर्द केली.

यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, सहकारात संस्कार महत्वाचे आहेत. या क्षेत्रात काम करताना विश्वासार्हता, सचोटी, त्याचबरोबर कामाप्रती निष्ठा असणे खूप गरजेचे आहे. या त्रिसूत्रीवर सामाजिक क्षेत्रात अनेक जण यशस्वी होतात. सहकार क्षेत्रात एक उत्कृष्ट मॉडेल म्हणून कल्याण जनता सहकारी बँक काम करत आहे.

ग्राहकांना चांगली सुविधा देण्याबरोबरच या बँकेने सामाजिक वनीकरण क्षेत्रातही सहभाग घ्यावा. बँकेच्या सर्व खातेदारांनी एक रोप लावून सामाजिक बांधिलकी जोपासावी असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांसह बँकेचे पदाधिकारी, सभासद आदी उपस्थित होते.