वृक्षसंपदेच्या वैविध्याने समृद्ध नागनगरी (विशेष वृत्त)

0
9

नागपूर, दि. 18 :  नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्य अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही हे वैविध्य औत्सुक्यपूर्ण ठरत आहे. नागपूरचे विधिमंडळ जेथे आहे; तो परिसर सिव्हिल लाईन्स म्हणून ओळखला जातो. हा परिसरही वृक्षराजीने संपन्न आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यासही मदत होत आहे. उन्हाळ्यात तापमानवाढीचे नवे आलेख निर्माण होत असताना नागपूर शहरवासियांनी, विद्यार्थ्यांनी एक चळवळ म्हणून वृक्षलागवड केली आहे, त्यामुळे नागपूर एक हिरवेगार शहर दिसून येत आहे. सिमेंटच्या रस्त्यावरील ही झाडेही रस्ता करताना कापली जाऊ नयेत किंवा मरू नयेत यासाठी विशेष काळजी घेतली आहे. यामध्ये इमारती आणि कार्यालयांच्या भोवतींच्या झाडे, बागबगीचे झाडांची संख्या वेगळीच आहे.

लेक गार्डन’, ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलाव, नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन, नागपूरचे फुफ्फुस मानले जाणारे सेमिनरी हिल, फुटाळा तलाव, चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, गोरेवाडा तलाव अशा विविध वृक्षराजींनी संपन्न असलेल्या ठिकाणांनी नागपूरचे सौंदर्य वाढविले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा झाडी, रूंद सिमेंटच्या रस्त्याचे विभाजन करणाऱ्या जागेतही झाडे आणि इमारतींचे परिसरही हिरव्या गर्द झाडांनी व्यापलेले अशी ओळख नागपूरच्या सिव्हील लाईनची आहे. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्यांसाठी हा परिसर निश्चितच नयनरम्य आणि स्वप्नवत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर असलेल्या नागपूरच्या वैशिष्ट्यात भर घालते येथील वृक्षसंपदा. हे शहर केवळ हिरवाईने नटलेले नसून वृक्षसंपदेचे वैविध्यही त्याने जोपासली आहे. त्यामुळेच नागपूरच्या सौंदर्यात ही वृक्षवल्ली निश्चितच भर घालत आहे. अधिवेशनानिमित्त येणाऱ्यांमार्फत संपूर्ण राज्यभर या हिरवाईचा वसा पोहोचविण्यासाठी यावेळी विधिमंडळ परिसरातही वृक्षलागवडीचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here