रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले निवेदन

नागपूर, दि. 18 : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे, परिषदेचे अध्यक्ष आचार्य महंत श्रीगोपीराज बाबाजी शास्त्री, महंत पाचराऊत बाबा, पुरुषोत्तम ठाकरे, अमरावती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महंत प्रसन्न शास्त्री, प्रविण बिजवे, महंत नायंबास बाबा, महंत साळकर बाबा आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, रिद्धपूर ही महानुभव पंथियांची काशी म्हणून ओळखले जाते. मराठीचा पहिला गद्यग्रंथ लीळाचरित्र रिद्धपूर येथे लिहिला गेला. आद्य मराठी कवयित्री महदंबेचे धवळे हे काव्य याठिकाणी लिहिले गेले.  या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणी मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रेल्वे स्थानक व्हावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.