गडचिरोली जिल्ह्याची विकासाची गती वाढविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम करा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

गडचिरोली दि.18 : विविधतेने नटलेल्या गडचिरोली जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. या जिल्ह्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी प्रत्येकाने‘मिशन मोड’वर काम करावे,असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले. विविधतेने नटलेला व विविध भाषा असणारा गडचिरोली जिल्हा हा‘मिनी भारत’असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

गडचिरोली जिल्ह्यातील सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्पाचे उद्घाटन व विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्यपाल गडचिरोली येथे आले होते. नियोजन भवन येथे स्थानिक पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर,राज्यपालांचे सचिव संतोष कुमार,जिल्हाधिकारी शेखर सिंह,मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव,पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड,प्रकल्प अधिकारी,डॉ. इंदुराणी जाखड,जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडलावार,गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे इ. पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले गडचिरोली जिल्हा विकासाच्या दृष्टीने आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट आहे. आरोग्य,शिक्षण,दळणवळण,उद्योग या क्षेत्रात गतीने सुधारणा करण्याची गरज आहे. जिल्ह्यात निसर्ग संपत्ती मोठ्या प्रमाणात असून त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे.

बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यातील अडचणींबाबत त्यांनी राज्यपाल महोदयांना अवगत केले. यावेळी जिल्ह्यातील नक्षलवाद,पुलांचे बांधकाम,सिंचन सोयी सुविधा,उदयोग याबाबत चर्चा केली.

बैठकीआधी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नवजात शिशु विभाग,प्रसूतिपूर्व तपासणी कक्ष,शस्त्रक्रियागृह,अतिदक्षता विभागांना भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूढे यांनी रूग्णालया विषयी माहिती सादर केली.

कार्यक्रमामध्ये गडचिरोली येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल व त्यांनी केलेल्या विविध उत्कृष्ट जनजागृती कामाबद्दल गौरविण्यात आले. वसतिगृहाचे गृहपाल रवींद्र गजभिये यांचा मानचिन्ह देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आढावा बैठकीचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर यांनी केले तर राज्यपाल महोदय यांचे आभार अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी मानले. जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचे यावेळी सादरीकरण केले.