आदिवासी शाळा मंगरूळ चव्हाळा या संस्थेस अधिकचे सहकार्य करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर, दि.18 :आदिवासी शाळा मंगरूळ चव्हाळा ता. नांदगाव खंडेकश्वर जिल्हा अमरावती या संस्थेची जमीन समृद्धी महामार्गात गेली असल्याने त्यांना देण्यात आलेली नुकसानभरपाई वाढून मिळावी या विषयावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या संस्थेला त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून51 लाख रु देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली त्यावर बोलताना श्री. पटोले यांनी या शाळेत फासेपारधी समाजाची मुले शिकतात. हा समाज विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर अधिकचे सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, संस्थेला पर्यायी जमीन व इतर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हा समाज विकासाच्या मुख्य धारेत येण्यासाठी त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न वाढवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. या समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक विषयावरील सद्यस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.