राजधानीत २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ‘महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाज’शताब्दी महोत्सव

तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सर्वात जुनी मराठी संस्था म्हणून लौकिक असलेल्या महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त २१ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची संस्कृती,परंपरा जपण्यासाठी व राज्यातील उत्सव साजरे करण्यासाठी मराठी माणसांनी मिळून राजधानी दिल्लीत १९१९ मध्ये‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’या संस्थेची स्थापना केली. सांस्कृतिक,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या संस्थेचे यावर्षी शताब्दी वर्ष असून यानिमित्ताने शताब्दी महोत्सवात तीन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २१ डिसेंबर २०१९ ला पहाडगंज स्थित महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता मुग्धा वैशंपायन आणि धनंजय म्हसकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दिल्ली स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

महोत्सवात दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबरला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता गोव्यातील मोले येथील पाईकदेव भोलानाथ संस्था निर्मित‘संगीत करवीर सौदामिनी’नाटकाचे सादरीकरण होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

महोत्सवाच्या समारोपीय दिवशी २३ डिसेंबरला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता‘मैफल सुरांची आणि गप्पांची’हाप्रसिद्धअभिनेते प्रशांत दामले यांच्या गप्पांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित विशेष स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण व संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे.

संस्थेविषयी…

१९१९ मध्ये स्थापन झालेल्या‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’या संस्थेने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. व्यवसाय व नोकरीनिमित्त दिल्लीत निवासी मराठी माणसांना आपल्या पाल्यांना मराठीतून शिक्षण देता यावे म्हणून संस्थेने‘महाराष्ट्रीय शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थेची’स्थापना करून पहाडगंज भागात १९२९ मध्ये नूतन मराठी प्राथमिक शाळेची स्थापना केली. आज वरिष्ठ माध्यमिक शाळेत याचे रुपांतर झाले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रसिद्धकलाकार उत्तरा बावकर,प्रसिद्धउद्योजक अशोक शिंदे आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांचा समावेश आहे.

विविध कामांनिमित्त तसेच पर्यटनासाठी दिल्लीत येणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची रास्त दरात निवासी व्यवस्था व्हावी या उद्देशाने संस्थेने पहाडगंज भागात‘दिल्ली महाराष्ट्रीय समाज ट्रस्ट’ची स्थापना करून बृह्नमहाराष्ट्र हे अतिथीगृह उभारले.