शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती अभिमानास्पद – सुभाष देसाई

विधानपरिषदेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन

नागपूर, दि. 16 :  कला, क्रीडा व साहित्याची जाण असलेला प्रकांड कायदेपंडित, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले शरद बोबडे या मराठी माणसाची सरन्यायाधीशपदी निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन ठराव मांडताना काढले.

विधानपरिषदेच्या कामकाजाची आज ‘वंदे मातरम’ ने सुरुवात झाली. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर मंत्री सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्याबद्दल श्री. शरद अरविंद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, राज्यातील सर्वांना अभिमान वाटेल अशी निवड श्री. शरद बोबडे यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीने झाली आहे. श्री. बोबडे यांना कायदेविषयक वारसा आहे. त्यांचे आजोबा मनोहर बोबडे व वडील अरविंद बोबडे हे निष्णात कायदेपंडित होते. नागपुरातील त्यांच्या बोबडे वाड्याची कायद्याचे विद्यापीठ म्हणून ख्याती आहे. तेथे कायदेविषयक सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. अनेक कायदे विषयाच्या अभ्यासकांना येथे मार्गदर्शन मिळते.

श्री. बोबडे हे कायदेपंडित असण्याबरोबरच एक उत्तम कलाकार, उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. तबला वादन, टेनिस यामध्येही ते निपुण आहेत. याबरोबरच ते शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. शेतकरी लढ्यात ते नेहमीच पुढे असत. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी योग्य आहे हे त्यांनी कायद्याच्या भाषेत स्पष्ट केले. याबरोबरच शेतकऱ्यांचे खटले विनामूल्य चालविण्याचे कामही त्यांनी केले. कायदेतज्ज्ञ असण्याबरोबरच श्री. बोबडे हे माणुसकीचे चाहते आहेत, असे उद्गार श्री. देसाई यांनी काढले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्री. बोबडे यांचा परिचय देऊन म्हणाले की, श्री. बोबडे यांनी न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वाच्या खटल्यात न्यायदानाचे काम केले आहे. सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सरन्यायाधीश श्री. बोबडे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये  अभ्यासू, परिश्रम, धाडस याचा संगम आहे. उपेक्षितांना, दुर्लक्षित प्रश्नांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. पुढील काळात सर्वसामान्यांना आधार देणारे कार्य त्यांच्या हातून होईल.

यावेळी मंत्री डॉ. नितीन राऊत, विधान परिषद सदस्य सर्वश्री हेमंत टकले, गिरीश व्यास, शरद रणपिसेजोगेंद्र कवाडे, अनिल सोले, जयंत पाटील, सदाभाऊ खोत, कपिल पाटील आदींनी अभिनंदनपर भाषण केले.