संदर्भ आधीच पोहोचले… 10 डिसेंबरपासून विधिमंडळ ग्रंथालयाचे काम सुरू

नागपूर,दि. 15 :  विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे राज्याच्या प्रश्नांबाबत सदस्यांना आपली मते मांडण्याचे हक्काचे आणि कायदेशीर व्यासपीठ. सदस्यांना आपले मत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी संदर्भ मिळविण्यात मदत होते ती विधिमंडळ ग्रंथालयाची. त्यामुळे सोमवार (दि.१६ डिसेंबर) पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते ती येथे सुरू होणाऱ्या ग्रंथालयाच्या कामकाजापासून. १०डिसेंबरपासूनच येथील ग्रंथालयाचे काम सुरू झाले आहे.

विधिमंडळाचे कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. विधिमंडळात पहिल्यांदाच आलेल्या नव्या सदस्यांना यापूर्वी विधिमंडळाचे कामकाज कसे चालले,कोणत्या विषयावर अध्यक्ष,सभापतींनी काय निर्देश दिले आदी माहिती मिळविण्याचे हक्काचे स्थान म्हणजे हे ग्रंथालय आहे. मुंबईतील ग्रंथालयात लाखांहून अधिक पुस्तके आहेत. कायदे करणे हे विधिमंडळाचे महत्त्वाचे काम असल्याने कायदा या विषयाला वाहिलेलीच बहुतांश पुस्तके येथे आहेत. नागपूरच्या अधिवेशनावेळी ही सर्व पुस्तके आणणे आणि परत मुंबईला घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे आवश्यक ती पुस्तके आणली जातात. विशेषतः राज्याच्या स्थापनेपासूनची विधिमंडळाची कार्यवाही उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे आपल्या पूर्वसुरींनी राज्याचा एखादा प्रश्न कसा मांडला,त्यावर काय उत्तर देण्यात आले हे विधिमंडळ सदस्यांना कळण्यास मदत होते. विधिमंडळात उच्चारलेला आणि कामकाजात घेतलेला प्रत्येक शब्द टिपला जातो आणि तो ग्रंथालयामार्फत उपलब्ध करून दिला जातो. हे ग्रंथालय केवळ विधिमंडळ सदस्यांसाठीच नाही तर विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,पत्रकार आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून विधिमंडळ ग्रंथालयाचे कामकाजातील योगदान नक्कीच मोलाचे आहे.

००००