महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रशिक्षणासाठी पुढे येण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

 माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ संकेतस्थळाचे लोकार्पण 

मुंबई, दि. 14: राज्यात विविध विकास महामंडळे आहेत, त्यात महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी प्रशिक्षणासाठी पुढे शासन त्यांना मदत करण्यास तयार आहे असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे आयोजित कार्यक्रमात माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅनचा लोकार्पण सोहळा तसेच महामंडळाच्या संकेतस्थळ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आदित्य ठाकरे होते. मंचावर माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योति ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, माविमच्या अशासकीय सदस्य शलाका साळवी, संचालक रितू तावडे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सामाजिक उपक्रमास शासनाचे कायम पाठबळ असेल. राज्यातील विविध महामंडळे महिला सबलीकरणाचे काम करत असतात त्यांच्यात समन्वय असणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादीत करुन त्यांनी माविमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकरी तसेच ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांसाठी माविमने भरीव कार्य करावे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारण्यासाठी जे – जे काही करता येईल ते करू. प्लॅस्टिक बंदीमध्ये चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्या या महामंडळाने तयार करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 10 रुपयांची थाळी, सॅनिटरी नॅपकिन अशा विविध योजना राबविण्यासाठी माविमचे सहकार्य घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योति ठाकरे यांनी केले. दरम्यान महामंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. अद्ययावत आधुनिक स्वरुपाच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅनचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. माविमच्या आजपर्यंतच्या उपक्रमांचा आढावा स्लाईड शोच्या माध्यमातून घेण्यात आला. माविमच्या माध्यमातून झालेल्या उत्कर्षाची यशकथा धारावी येथील श्रीमती सफिना रफिक अस्तार यांनी यावेळी मांडली. महामंडळातर्फे प्रकाशित विविध माहितीपुस्तके, वार्षिक अहवालांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. श्रीमती श्रद्धा जोशी यांनी आभार मानले.