निळवंडे प्रकल्पाच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आदेश

0
5

मुंबई,दि. 12 : निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल यासाठी‘निळवंडे’प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देऊन,कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिले.

आज मंत्रालयात ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-2) संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामात काय अडचणी आहेत,त्या जाणून घेतल्या आणि प्रकल्पाला गती देण्याचे आदेश श्री. थोरात यांनी दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा  आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत  पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी  निधीची कमतरता नाही पण कामाला पाहिजे त्या प्रमाणात गती दिसत नाही यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचे नियोजन करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून प्रकल्प पूर्ण करावा अशा सूचनाही श्री. थोरात यांनी दिल्या.

या प्रकल्पाच्या कामाचा पुन्हा आढावा घेण्यासाठी लवकरच प्रकल्पाची पाहणी करण्यात येईल,असे आश्वासनही श्री. थोरात यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

यावेळी संबंधित अधिकारी,शेतकरी ज्ञानेश्वर वर्षे,गंगाधर गमे,नानासाहेब शेळके,उत्तमराव घोरपडे,रवींद्र गागरे,संजय येलमे,दादासाहेब पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here