नवी दिल्ली, दि. 11 : कला साधनेतून वारली या आदिवासींच्या समृध्द कलेला कॅनवासवर चित्रित करणारे अहमदनगर येथील चित्रकार अरविंद कुडिया यांच्या वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन राजधानी दिल्लीत देश-विदेशातील कला रसिकांचे आकर्षण ठरत आहे.
पालघर, मुरबाड, जव्हार भागातील आदिवासींच्या समृध्द सांस्कृतिक वैभवाचा गेल्या 22 वर्षांपासून अभ्यास करणारे अरविंद कुडिया यांनी प्रथमच वारली या लहान आकारातील चित्रांसाठी प्रसिध्द असलेल्या कलेला भव्य आकारात प्रदर्शित करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. येथील मंडीहाऊस परिसरात स्थित ललित कला अकादमीच्या कला दालनात ही प्रदर्शनी लावण्यात आली असून 6X6 ते 7X17 फूट अशा भव्य आकारातील तब्बल 12 चित्र याठिकाणी प्रदर्शन व विक्रीसाठी आहेत.
चित्रांच्या वैशिष्ट्यांवर दृष्टीक्षेप
या प्रदर्शनीच्या दर्शनी भागात ‘कुलदेवी’ ही आदिवासींची ग्रामदेवता या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित कलाकृती कला रसिकांना आकर्षीत करते. 6X6 फूट आकारातील या कलाकृतीमध्ये देवीची पूजा करण्यासाठी जाणारे आदिवासी, वारली जीवनशैली तसेच आदिवासी लोकं मुंगींची पूजा करतानाचा प्रसंग दर्शविला आहे.
‘वारली पाडा’ या 6X6 फूट आकाराच्या कलाकृतीत पालघाट येथील आदिवसींची कुलदेवता दर्शविण्यात आली आहे. देवचौक आणि त्यात चंद्र-सूर्य, धान्याची कोठी, तारपा आदी प्रतिक शोभून दिसतात. पावासामुळे आदिवासींच्या जीवनात आलेली समृध्दी विविध प्रतिकांच्या प्रभावी वापरातून या कलाकृतीमध्ये दर्शविण्यात आली आहे.
‘ध्यान’ ही मध्यवर्ती कल्पना मांडणारी 6X6 फुटाची कलाकृती ‘शून्यातून शून्याकडे’ जाण्याचा आध्यात्मिक प्रवास दर्शविते. या कलाकृतीत भगावान गौतम बुध्दांच्या ध्यानावस्थेतील 5 प्रतिमा बोलक्या आहेत. त्राटक ध्यानाच्या सकारात्मक वलयाने आदिवासी परिसर वेढल्याचा संदेश श्री. कुडिया यांनी या कलाकृतीत कौशल्याने मांडला आहे.
या प्रदर्शनीत 7X17 फुटांच्या भव्य तीन कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. ‘तारपा नृत्य’या कलाकृतीत आदिवासींचे पारंपरिक तारपानृत्य, त्याचे आदिवासींच्या जीवनातील महत्त्व लग्नप्रसंगी आणि भाताचे चांगले पीक झाल्यावर व्यक्त होणारा आनंद आदी प्रसंगांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. ‘कृष्णलिला’ आणि ‘कल्पवृक्ष’ या भव्य कलाकृतींमध्ये भगवान कृष्णाच्या कालिया मर्दन, पुतनावध आदी 10 प्रसंग आणि मोठ्या कल्पवृक्षाखाली ध्यानावस्थेत बसलेली व्यक्ती दर्शविली आहे.
याशिवाय भगवान गौतम बुध्दांच्या जन्मापासून ते बुध्दत्वापर्यंतचा प्रवास दर्शविणारी ‘बुध्द’ ही कलाकृती, समृध्द वारली परंपरेतून संन्यस्थाचा प्रवास दर्शविणारी ‘अंतस’ ही कलाकृती, ‘गोवर्धन’ ही भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग कलात्मकरित्या मांडणारी कलाकृती या ठिकाणी कलारसिकांचे आकर्षण ठरत आहेत. ही सर्व चित्र ॲक्रालिक रंगांची असून कॅनव्हासवर चित्रित करण्यात आली आहेत.
नाशिक येथील मंजू चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन
ललित कला अकादमीच्याच कला दालनात नाशिक येथील श्रीमती मंजू चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन पहावयास मिळते. महाराष्ट्राची संस्कृती या मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत 1X1.5 फूट ते 3 X4 फूट आकारातील एकूण 37 चित्र या ठिकाणी प्रदर्शीत करण्यात आली आहेत. यात वाडासंस्कृती, लोकजीवन, नागरी जीवन, लेण्या, मंदिर आदींचा समावेश आहे.
ही प्रदर्शनी 13 डिसेंबर 2019 पर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध राहणार आहे.
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.266/ दिनांक ११.१२.२०१९