‘हिमालयाची सावली’ने उद्या पु. ल. कला महोत्सवाचा होणार समारोप

0
11

मुंबई, दि. 14 : दि. 8 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या ‘पु. ल. कला महोत्सव 2019’ चा समारोप उद्या दि. 15नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव व सिद्धार्थ जाधव प्रमुख पाहुणे आहेत. पु. ल. कला महोत्सव2019 अंतर्गत विविध कला आविष्कारांवर आधारित दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला अनेक रसिकांनी भेटी दिल्या. अभंग रिपोस्ट या पारंपरिक शास्त्रीयरॉक संगीत पद्धतीवर झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन झाले होते तर समारोप हिमालयाची सावली या नाटकाने होणार आहे. या महोत्सवामध्ये कुसुम मनोहर लेले हे नाटक, इला भाटेंची ‘पै पैशाची गोष्ट’, सलील कुलकर्णी यांचा ‘बाकीबाब आणि मी’, संदीप खरे, शेखर जोशी, सावनी शेंडेचा ‘इर्षाद’, मेघा घाडगेचा लावणीचा कार्यक्रम, रेश्मा कारखानीसांची कविता, साहित्य संघाचे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’, ग्रेस यांच्यावर बेतलेली कलाकृती ‘कवी जातो तेव्हा’, ‘काजव्यांचा गाव’, ‘गुगलीफाय’ नाटक, ‘लाली’ एकांकिका, देवानंद माळी यांचा लोककला कार्यक्रम, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे नाट्य सादरीकरण, लहान मुलांसाठीचे कार्यक्रम व कार्यशाळा या व अशा अनेक कलाकृतींना प्रेक्षकांनी अक्षरशः भरभरून प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक घटकांचे संवर्धन होण्यासाठी अकादमीतर्फे निर्माण केलेल्या ‘महाकला’ या वेबसाईटचे उद्घाटनही होणार आहे. रोषणाईने उजळून निघालेल्या पु. ल. अकादमीस गेले आठ दिवस वेगळेच स्वरूप प्राप्त झालेले आहे. यापुढेही अकादमीच्या माध्यमातून अशाच दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.

दि. 15 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्यमंदिरामध्ये संपन्न होणाऱ्या या समारोप कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here