पु. ल. कला महोत्सवामध्ये स.न.वि.वि. उपक्रमात सुरुवात

मुंबई, दि. 14 : बालदिनाचे औचित्य साधून पु. ल. कला महोत्सव 2019 मध्ये सप्रेम नमस्कार विनंती विशेष या विशेष उपक्रमाची सुरुवात होणार आहे. लोप पावत चाललेल्या पत्रलेखन संस्कृतीचे संवर्धन व वहन व्हावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मोबाईल व इंटरनेटच्या या काळात“पत्रलेखनातून व्यक्त होणे”ही भावना जवळ जवळ लुप्त झाली आहे. लहान मुलांना तर पत्रलेखन म्हणजे फक्त परीक्षेपुरतेच माहित आहे. विविध समाजमाध्यमे व मोबाईल हेच संपर्काचे साधन आहे, अशी भावना लहान  मुलांमध्ये दृढ झालेली आहे.

मुलांमध्ये लेखन व वाचन वाढावे हा दृष्टीकोन समोर ठेवून पु. ल. कला महोत्सवामध्ये येणाऱ्या लहान मुलांना पोस्टकार्डचे वाटप करण्यात येणार आहे. पोस्टकार्ड मिळालेल्या मुलाने त्याच्या जवळच्या कोणत्याही एका व्यक्तीला पत्र लिहिणे अपेक्षित आहे. ज्या व्यक्तीला हे पत्र लिहिले जाईल त्या व्यक्तीने पुढे त्याच्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावे असे अभिप्रेत आहे. यामुळे समाजमाध्यमाशिवाय इतरही काही चांगली संपर्काची साधने आहेत हे मुलांच्या लक्षात येईल व लोप पावत चाललेल्या पत्र संस्कृतीचे संवर्धन होईल ही अपेक्षा आहे. दि. 15 नोव्हेंबर रोजी पु. ल. अकादमीमध्ये येणाऱ्या प्रत्येकास (प्रौढ व बालके) एकेक पोस्टकार्ड/आंतरदेशीय कार्ड देवून पत्र लिहिण्यास उद्युक्त करण्याचा उपक्रम होणार आहे.