मुंबई दि. 2 : अवकाळी पावसाने तसेच अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परिवहन व खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते हे पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. श्री.रावते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून परिस्थितीची पाहणी करत आहेत.
वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, भावनाताई गवळी, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि नितीन देशमुख हे लोकप्रतिनीधीही संबंधित जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून परिस्थितीची पाहणी करत आहेत. पाहणीनंतर ते मंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडील बैठकीत चर्चा करणार आहेत.
शेतीपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने तातडीची मदत जाहीर करावी, 3 महिन्याचे वीज देयक माफ करण्याचा निर्णय, शासनाचा पंचनामा ग्राह्य धरत पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश संबंधित विमा कंपन्यांना देण्यात यावेत. या संदर्भातील निवेदन श्री. रावते यांनी मुख्यमंत्री यांना सादर केले आहे.