मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूलमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची केली आस्थेने चौकशी

रत्नागिरी, दि. १७ : शिर्डी येथे उपचार सुरू असलेल्या ८४ विद्यार्थी व ४ शिक्षकांची व्हिडियो कॉलच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आस्थेने चौकशी केली. रत्नागिरी येथून हा संवाद साधत शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आणि संबंधितांना मुलांची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकरदेखील उपस्थित होते.

अमरावतीतील आदर्श हायस्कूल दर्यापूर येथून २३० मुले आणि १५ शिक्षक शिर्डीत आले होते. शेगाव, अहमदनगर येथून ते सर्वजण रात्री देवगडकडे जाणार होते. काल १६ फेब्रुवारी रोजी दुपारी शेगाव, अहमदनगर येथे त्यांनी स्वतः तयार केलेले जेवण जेवल्यानंतर रात्री १० च्या सुमारास त्रास जाणवल्यामूळे त्यातील ८४ मुले आणि ४ शिक्षकांना उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

आज शिक्षक महाअधिवेशनानिमित्ताने रत्नागिरी असलेल्या महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत शिर्डी उपविभागीय अधिकारी आणि साईबाबा संस्थानचे साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांच्यासह संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच वेळोवेळी याबद्दलची माहिती घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत केले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विखे पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासमवेत असताना थेट अहमदनगर येथे संबंधित अधिकारी वर्गाकडून व्हिडियो कॉलच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती जाणून घेत आस्थेने चौकशी केली. यावेळी उपचाराअंती सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घेऊन यावेळी मुलांची काळजी घेण्याबाबतचे आदेश संबधितांना त्यांनी दिले आहेत.