जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या १३०२ योजनांना मंजुरी-  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ९ :  जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ ही केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या १३०२ योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दुर्गापूर येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे जलजीवन मिशन अंतर्गत ७.५ लक्ष क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी बांधकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे,  रामपाल सिंग सरपंच पूजा मानकर, उपसरपंच प्रज्योत बोरीकर, नामदेव डाहुले, आशिष देवतळे,  हनुमान काकडे, रोशनी खान, वनिता आसुटकर विलास टेम्भूर्णे,  नामदेव आसुटकर, अनिल डोंगरे, श्रीनिवास जंगम,  केमा रायपुरे, रूद्र नारायण तिवारी, अंकित चिकटे, संगीता येरगुडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता प्रशांत बुरडे, कार्यकारी अभियंता  विनोद उद्धरवार आदी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याच्या टाकीबाबत दुर्गापूर परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी प्रलंबित होती. आज ती मागणी पूर्ण करताना मला अतिशय आनंद होत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या टाकीच्या भूमिपूजनाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध धर्माच्या पाच धर्मगुरूंच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात नळाद्वारे येणारे पाणी केवळ तहानच भागवणार नाही, तर या धर्मगुरूंचा आशीर्वाद सुद्धा पाण्याच्या रूपाने आपल्या घरात येईल.

कार्यक्रमाला येतांना वार्ड क्रमांक 3 मधील नागरिकांनी आपल्याला निवेदने दिली. निवेदन देताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विश्वास दिसत होता की, या परिसरातील समस्या आता पूर्णपणे निकाली निघतील. कारण या परिसराचा आमदार म्हणून जनतेने सदैव आपल्याला साथ दिली आहे. वार्ड क्रमांक ३ च्या ८० टक्के समस्या सोडविण्यात आल्या आहेत. उर्वरित छोट्या-मोठ्या नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढून नाली, पाणी सिमेंट रस्ते, ड्रेनेज आदी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देऊ. या परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार अतिक्रमण हटविण्यात येणार होते, मात्र त्यासाठी आपण लढा दिला. त्यामुळे लोकांचे घर वाचले. आता मंत्री असल्यामुळे विकास कामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सिद्धार्थ चौकापासून मोहर्लीपर्यंतच्या सिमेंट रस्त्यासाठी २० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील उभा केला. आता या मुख्य रस्त्यावरील वॉल कंपाऊंडवर छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती निर्माण करण्यात येईल. साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गत सात महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे आपल्या कानावर आले आहे. पुढील सात दिवसात सर्व कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुर्गापूर येथील नागरिकांनी नेहमीच प्रेमाचे कर्ज दिले आहे. आता विकासाचे व्याज देण्याची जबाबदारी माझी आहे. राज्य शासनाने गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. असंघटित कामगारांना आता सुरक्षा कवच राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. शेतकरी सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना आता 6 हजार रुपयांऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लक्ष्यावरून थेट पाच लक्षापर्यंतचे उपचार राज्य शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. निराधार, परितक्त्या, घटस्फोटीत महिला आदींच्या अनुदानात वाढ करण्यात आल्याची घोषणा नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

केंद्र सरकारने ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरविले आहे. जिल्ह्यात रमाई योजनेअंतर्गत ५ हजार घरकुल आपण मंजूर केले असून अजून 2700 घरकुल शिल्लक आहेत. आदिवासी बांधवांनासुद्धा शबरी घरकुल योजनेचा लाभ घेता येईल. ओबीसी बांधवांसाठी १० लक्ष घरे बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात आपल्या जिल्ह्याचा कोटा वाढविण्यात येईल. म्हाडामध्ये महाप्रीत अंतर्गत १० हजार घरे बांधण्याचा आपण संकल्प केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विकासाची २०५ कामे पूर्ण करण्यात आली आहे. मुलींना आकाशात झेप घेता यावी म्हणून एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर – बल्लारपूर रस्त्यावर उभे करण्यात येत आहे. यात कौशल्य विकासाचे ६२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतील. या विभागाच्या विकासासाठी आपण नेहमीच अग्रेसर आहोत. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, सिंचन, मिशन कोहिनूर, मिशन जयकिसान याला आपले प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अधिक्षक अभियंता श्री. बुरडे म्हणाले, दुर्गापूर पाणी पुरवठा योजनेची मंजूर किंमत १५ कोटी ३३ लक्ष इतकी असून सदर निविदेचा कालावधी १५ महिने (३० एप्रिल २०२४) पर्यंत आहे. या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घर जोडणी संख्या २९०५ आहे. यात १०० टक्के प्रमाणात नळ जोडणी होणार आहे.

या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजूर उपांगे जसे, जोडनलिका, अशुद्ध पाण्याची उर्ध्वनलिका, अशुद्ध पाण्याची पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाण्याची पंपिंग मशिनरी, शुद्ध पाण्याची उर्ध्वनलिका, पाण्याची उंच टाकी, वितरण व्यवस्था, पुश थ्रु रोड क्रॉसिंग, किरकोळ कामे व बंधारा आदी कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.