सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे, नदीची स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. यासाठी आवश्यक ती दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर माईघाट सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कलश पुजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपवनसंरक्षक निता कट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, जलसंपदा विभगाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, जलबिरादरी महाराष्ट्र राज्य नरेंद्र चुग आदि उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या भेडसावत आहेत. त्याचा शेती उत्पादनावरही विपरीत परिणाम होत आहे. वाढते नागरीकरण व औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. या बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी चला जाणूया नदीला या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांनी नदीला जाणून घेवून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. या अभियानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शासन यासाठी कुठेही कमी पडणार नाही. नदी स्वच्छ, सुंदर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी या उपक्रमास नागरिकांनीही त्यांचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपवनसंरक्षक निता कट्टे व श्री. नरेंद्र चुग यांनी मनोगत व्यक्त करताना चला जाणुया नदीला या अभियानाचा हेतू विशद करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कृष्णा, माणगंगा, कोरडा, महाकाली, येरळा, अग्रणी व तिळगंगा या सात नद्यांचे कलश पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली. शेवटी या सर्व कलशांचे कृष्णा नदी मध्ये विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले. सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. अवताडे, चला जाणुया नदीला अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र व्होरा, कृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील, अग्रणी नदी समन्वयक अंकुश नारायणकर, महांकाली नदी समन्वयक सागर पाटील, तिळगंगा नदी समन्वयक प्रकाश पाटील, येरळा नदी समन्वयक संपतराव पवार, जाई कुलकर्णी, कोरडा नदी केंद्रस्थ अधिकारी सचिन पवार, माणगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी अभिनंदन हरगुडे, येरळा नदी केंद्रस्थ अधिकारी डी. एस. साहुत्रे, सांगली पाटबंधारे विभागाच्या सहायक अधीक्षक अभियंता तृप्ती मुकुर्णे, उपकार्यकारी अभियंता श्वेता दबडे, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.