सुदान मधून परत आलेल्या नागरिकांच्या दुसऱ्या बॅचमधून सांगली जिल्ह्यातील २५ ते ३० नागरिक मायदेशी परतले

            सांगली दि. ५ (जि.मा.का.) :- भारत सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे परत आणले जात आहे. दि. ४ मे २०२३ रोजी रात्री ०९.३० वा. अहमदाबाद येथे व आज सकाळी ६ वाजता दिल्ली येथे ३१४ नागरिक विमानाने सुखरूपपणे पोहोचले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील २५ ते ३० नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांनी सांगली जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.

            यापूर्वी ३ मे रोजी सुदान येथून जिल्ह्यातील  ७ नागरिक मायदेशी सुखरूप परतले आहेत. सांगली जिल्ह्यातून सुदान येथे कामासाठी गेलेल्या नागरिकांना  सुखरूपपणे परत आणणे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय भारतीय दूतावासाच्या संपर्कात होते. आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक पावले उचलली.

            सुदानमध्ये  अडकलेल्या जिल्ह्यातील आपल्या नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यावर अधिकाऱ्यांची ‍नियुक्तीही जिल्हा प्रशासनाने केली होती.