रात्री दीडपर्यंत पालकमंत्र्यांनी घेतला जनतेच्या तक्रारींचा आढावा

यवतमाळ, दि १६ जिमाका:- नेरमध्ये झालेल्या जनता दरबारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रात्री दीड वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण केले. यावेळी आजंती गावातील पारधी समाजाच्या नागरिकांना घरकुलासाठी जागा देण्याचा प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

या जनता दरबारमध्ये जुन्या ५३६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर नव्याने ३१९ तक्रारी  प्राप्त झाल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, तहसिलदार शिवाजी मगर,  गटविकास अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.

यावेळी जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, कि जनतेच्या आशिर्वादाने  तिनदा मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. पालकमंत्री म्हणुन समाधान शिबिराच्या माध्यमातुन जनतेच्या तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न मी पूर्वीही केला होता. त्यावेळी वणी पासुन उमरखेड पर्यंत तक्रारी प्राप्त झाल्यात आणि प्रशासनाने त्या निकाली काढण्यात आल्या. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यात आली होती.

यावेळी सुद्धा जनता दरबारच्या माध्यामातुन नागरिकांकडून त्यांच्या तक्रारी मागवल्या होत्या. मात्र काही कारणास्तव ठरलेल्या  दिवशी जनता दरबार घेता आला नाही. दरम्यानच्या काळात प्रशासनाने प्राप्त  तक्रारी सोडवल्या. तरीही नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे समाधान झाले की नाही याची विचारणा करणे जिल्ह्याचा पालक म्हणुन माझे काम आहे. नेर तालुक्यात ५३६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या पैकी सर्व तक्रारी निकाली निघाल्यात. उपस्थित नागरिकांच्या काही  नवीन निवेदन, अडचण, तक्रार असेल तर करू शकतात. प्रशासन त्यावर लगेच कार्यवाही करून त्या निकाली काढतील असा मला विश्वास आहे.

याठिकाणी अनेक विभागाचे प्रमुख हजर आहेत. जुन्या तक्रारींचा आढावा तुमचा प्रतिनिधी म्हणून मी घेणारच आहे, पण नवीन तक्रारी सुद्धा आपण दिल्या तर त्याचाही आढावा प्रशासन या ठिकाणी घेईल. आपले विकासाचे काम असेल वैयक्तिक काम असेल प्रशासनाकडून या सर्व गोष्टींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांना त्यांनी निर्देश दिलेत.

हे सर्वसामान्य जनतेचे राज्य आहे,सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आज राज्य सरकार अनेक निर्णय घेत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्यशासनाने क्रांतिकारी निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान च्या माध्यमातून  ६ हजार रुपये देण्यात येत होते त्यात राज्य शासनाने आपली योजना सुरू करून आता शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये मिळतील म्हणजे वार्षिक १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहेत.

सरकार आपलं आहे, आणि सरकार आपल्या दारी आहे. या शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वत: आणि प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी आले आहेत. आपल्या तक्रारी निकाली निघाल्या पाहिजेत ही भूमिका शासनाची आणि प्रशासनाची आहे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या जनता दरबारमध्ये नविन ३१९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्या १५ दिवसात निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री श्री राठोड यांनी दिले. तसेच जुन्या ५३६ तक्रार दारांचे म्हणने ऐकुन घेऊन त्यांच्या तक्रारी निकाली निघाल्यात कि नाही, त्यांचे समाधान झाले की नाही याची खातरजामाही केली. यावेळी नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.