Wednesday, December 25, 2024
Home Blog Page 12

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

नागपूर, दि. 17 – राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अऩावरण करण्यात आले.

विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.

आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणी,  गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे,  पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती, पशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे.  सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.

00000

 

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार; नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

नागपूर, दि. १७ नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलरअर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्यासंदर्भातील करार करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, विविध विभागांचे सचिव, आशियाई विकास बँकेचे विविध विषयतज्ज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक (एसपी) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.

0000

संतोष तोडकर/विसंअ/

 

 

 

 

करदात्याप्रती सहृदयता जपत सक्षम व पारदर्शीपणे काम करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर, दि. १७ :  करदात्यांकडून कररूपात मिळणारा पैसा हा त्यांच्यासाठीच आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा निर्मितीसाठी वापरात येतो. हा संदेश विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत सकारात्मक पद्धतीने पोहोचविण्याची गरज आहे. आयकर अधिकाऱ्यांनीही करदात्या प्रती सह्रदयता जपत सक्षम व पारदर्शिपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य हरिंदर बीर सिंग गिल, प्रधान महानिदेशक (प्रशिक्षण) संजय बहादुर, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे महानिदेशक (प्रशिक्षण) पी. सेलवा गणेश, अपर महानिदेशक (प्रशासन) मुनीष कुमार, अपर महानिदेशक शिदारामप्पा कपटनवार, अप्पर महानिर्देशक  आकाश देवांगन, अपर महानिदेशक अंकुर आलिया,  प्रशिक्षणार्थी आयकर अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, उत्कृष्ट प्रशासक म्हणून घडविणारे हे प्रशिक्षण या तुकडीला परिपूर्ण करणार आहे. हे प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात राष्ट्रीय कर अकादमी महत्वाची भूमिका पार पाडेल.  करदात्यांसोबत योग्य व्यवहार करुन करसंकलन करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल. आपले कर्तव्य बजावताना आदर्श परिमाणांसोबत तडजोड न  करता नैतिकता व सदाचाराचे पालन करुन या पदाला योग्य न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी  केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने आपली गौरवशाली परंपरेची जोपासना करुन अधिकाधिक  प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे.  यावर्षीची ७८ वी तुकडी प्रशिक्षित होत आहे, हे अभिमानास्पद आहे. २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आपण पूर्णत्वास नेणार आहोत. त्या करता त्यांचाही मोलाचा वाटा आणि सहभाग असणार आहे, असा आशावादही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी, अकादमीचे अंकुर आलीया यांनी ७८ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी विषयी माहिती दिली. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

१६ महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण

नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी  ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी (आयकर) सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षांद्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. थेट भरती झालेले हे अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यापूर्वी एनएडीटी, नागपूर येथे  १६ महिन्यांचे  सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण करतात.

१४५ अधिकारी प्रशिक्षणार्थी

७८ व्या तुकडीच्या नवीन बॅचमध्ये रॉयल भूतान सर्व्हिसच्या २ अधिकाऱ्यांसह १४५ अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत. राष्ट्राच्या विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मानसिकतेसह हे प्रशिक्षण सुसज्ज करते. इंडक्शन ट्रेनिंगची प्रशिक्षण पद्धत विकसित भारत या संकल्पनेवर आधारित आहे. अधिकाऱ्यांमध्ये उत्कृष्टता, उत्तरदायित्व आणि नवोपक्रमाची संस्कृती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते . कार्यक्रमात वर्ग सत्रे, व्यायाम, केस स्टडी आणि परस्पर चर्चा यांचे मिश्रण समाविष्ट आहे, ज्यामध्ये कर प्रशासन, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेच्या विविध पैलूंचा समावेश आहे.

00000

विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. 17 (शिबिर कार्यालय) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर

नागपूर, दि. १७ : विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली.

विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य सर्वश्री विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम, दिलीप सोपल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.

०००

माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना विधानसभेत श्रद्धांजली

नागपूर, दि. १७:  विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री दत्तात्रय महादेव राणे यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत माजी सदस्य दत्तात्रय राणे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला.

०००

खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूरकरांना देशभरातील कलावंतांना अनुभवण्याची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.१६ : खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला तसेच अनुभवण्याची संधी दिली. महोत्सवाची ही पर्वणी अशीच लाभत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज खासदार सांस्कृतिक महोत्सवास भेट दिली. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, आ.मंजुळा गावित, आ.अमित गोरखे, माजी आमदार अनिल सोले, दैनिक हितवादचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, उद्योजक यशपाल आर्य, पदमेश गुप्ता, यशपाल गुप्ता आदी उपस्थित होते.

देशभरातीलच नाही तर आपल्या भागातील कलावंतांसाठी देखील खासदार सांस्कृतिक महोत्सव मोठे व्यासपीठ, दालन ठरले आहे. महोत्सवातील वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धांमधून नागपूरचे सांस्कृतिक क्षेत्र उजळून निघेल. या महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजन समितीचे आभार मानतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरातील हा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे, त्याचा विशेष आनंद असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

महोत्सवातील कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात. हा महोत्सव नागपूरकरांच्या जीवनाचा अंग झाला आहे. कुमार विश्वास यांच्यासारख्या लेखक, कवी, विचारवंताच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. कुमार विश्वास उपस्थितांना मंत्रमुग्ध करतात. ते केवळ तत्वच सांगत नाही तर तात्विकतेने जगत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमासदेखील मुख्यमंत्री श्री.फडणवीस उपस्थित राहिले.

खासदार महोत्सवातून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. मनोरंजनातून सांस्कृतिक अभिरुची, लोकप्रबोधन, लोकसंस्कार  होत आहेत. महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य, समर्थन लाभते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील वाहनाची १८ डिसेंबर रोजी लिलावाद्वारे विक्री

मुंबई, दि. 16 : मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई या कार्यालयातील मारुती स्विफ्ट डिझायर (पेट्रोल)  हे वाहन जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाचा लिलाव दि. 18 डिसेंबर 2024 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, महापालिका मार्ग, मुंबई 400001 येथे होणार असून दि. 17 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पहावयास मिळेल.

या वाहनाची बोलीची सुरुवातीची किंमत 60 हजार एवढी आहे. अधिक माहितीकरिता सहा. प्रबंधक (लेखनसामग्री) मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, मुंबई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर, दि. १६ : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच यशस्वीतेसाठी स्वयंशिस्त यशाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती  सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

ऑडिटोरियम हॉल, नॅशनल फायर सर्विस कॉलेज येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२ व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते.

यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, विविध विभागांचे अधिष्ठाता प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२ व्या दीक्षान्त समारंभात सहभागी होणे अत्यंत आनंदाची आणि गौरवास्पद असल्याचे सांगत सर्व पदवीधर, पदक विजेते आणि पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाने नुकतीच आपली शतकपूर्ती साजरी केली असून राष्ट्रनिर्माण कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे शतकभरात अनेक प्रख्यात माजी विद्यार्थी घडविले असल्याचे राज्यपाल म्हणाले.

विद्यापीठाने मध्य भारतातील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षणाचे धडे दिल्याचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांच्या यादीवर नजर टाकल्यास लक्षात येते. आदर्श नेते, महान तंत्रज्ञ, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, उत्कृष्ट कलाकार, महान शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगली माणसं तयार करण्याचे कार्य विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठाने आपल्या शतकपूर्तीनिमित्त भारतीय विज्ञान काँग्रेस, भारतीय औषधशास्त्र विज्ञान काँग्रेस, राज्यस्तरीय नेतृत्व गुण विकास कार्यक्रम यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबवले. विद्यापीठाने दाखवलेली संशोधनाची दिशा देखील प्रशंसा करण्याजोगी आहे आणि विद्यापीठातील तरुण संशोधकांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी, विशेषत: स्थानिक समुदायाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने, जागतिक नेते बनण्याच्या मार्गावर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात आले आहे.  प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @ २०४७’ या महत्त्वाकांक्षी मिशनच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठेवणारे हे धोरण असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यावेळी म्हणाले.

स्वागतपर भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली.

पुरस्कारांचे वितरण

एनएमडी महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थिनी प्रगती रमेश छतवानी यांना ६ सुवर्ण पदके, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थिनी रूपाली केवलराम देशपांडे यांना ४ सूवर्ण पदके व १ पारितोषिक, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी नूतन पांडुरंग इंगोले यांना ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक तसेच डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी अजय सुखदेव नरांजे यांनी एमए (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक, विद्यापीठ जनसंवाद विभागातील तेजस अतुल पाटील याने ३ सुवर्णपदक व एक पारितोषिक, विद्यापीठ पदव्युत्तर गृहविज्ञान विभागातील दिव्या अनिल पैतोड हिला ४ सुवर्ण पदके देऊन गौरविण्यात आले. श्री बिंजानी सिटी कॉलेज नागपूर येथील केदार विश्वनाथ खोब्रागडे ४ सुवर्णपदक तर विद्यापीठाची वयाच्या ६५ व्या वर्षानंतर आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल योगतज्ञ डॉ. विठ्ठलराव जिपकाटे पारितोषिक रामदास बुचे यांना प्रदान करण्यात आले.

१ लाख ३ हजार ३०३ विद्यार्थ्यांना पदवी वितरण

दीक्षान्त समारंभात १,०३,३०३ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये स्नातक पदवीधर ८४,३१० विद्यार्थी तर स्नातकोत्तर पदवीधर १८,७७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांतील पात्र पदवीकांक्षींची (डिग्री सर्टिफिकेट) विद्याशाखा निहाय संख्या : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – ३७,९६७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – २५,१४१, मानव विज्ञान विद्याशाखा – २४,१६०, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – ८,५२२, स्वायत्त महाविद्यालये – ६,७५८, पदविका प्रमाणपत्र -७५५

आचार्य पदवी प्रदान

या दीक्षान्त समारंभात विद्या शाखा निहाय २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत ९०, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत ५२, मानवविज्ञान विद्याशाखेत ६९, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १० आदींचा समावेश आहे. तसेच १ विद्यार्थी एम.आर्च. (बाय रिसर्च) या पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.

०००

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीच्या ग्रंथाची निर्मिती होणार

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya
  • ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळाची निर्मिती

नागपूर, दि. १६: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमुख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते अनुशेषापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा हिवाळी अधिवेशनात झाल्या आहेत. याचा आढावा घेणारा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारावा असा मानस आहे. येथील तिन्ही पिढ्यांचा सहभाग असलेले सशक्त संपादक मंडळ या ग्रंथाची दिलेल्या मुदतीत अभ्यासपूर्ण निर्मिती करेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

येथील विधानभवनात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांची विशेष बैठक उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रीत केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील राष्ट्रकुल समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस विधानभवनचे सचिव 2 (कार्यभार) विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, नागपूर विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे,  माजी संपादक सुधीर पाठक, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्रा, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, पुण्य नगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, आनंद निर्वाण, विश्वास इंदुलकर, शैलेश पांडे, महेश उपदेव, रवी गुळकरी, विकास वैद्य, वैभव गांजापुरे व इतर सन्माननिय पत्रकार उपस्थित होते. या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांनी आपले योगदान देण्याचे सहर्ष मान्य केले.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

‘नागपूर येथील हिवाळी अधिवेशने – विधानपरिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा’ या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी संपादकीय मंडळ निश्चित करण्याचा सर्वांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. यात प्रदीप मैत्र, कार्याध्यक्ष, श्रीपाद अपराजित, श्रीमंत माने, गजानन निमदेव, रमेश कुलकर्णी, शैलेश पांडे, भुपेंद्र गणवीर, महेश उपदेव, प्रभाकर धुपारे, मनिष सोनी, आनंद निर्वाण, विकास वैद्य आणि नागपूर – अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे. समन्वय संपादक निलेश मदाने यांचा समावेश आहे. आवश्यक तो विस्तार यात चर्चेनुसार केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.

या प्रस्तावित ग्रंथासंदर्भात चर्चा करताना यातील मजकूर हा संशोधन व संदर्भाच्या दृष्टीने पूरक असावा असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. विशेषतः हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करताना पत्रकारांनी जे अनुभवले ते यात प्रतिबिंबित झाल्यास त्यातील वाचनियता वाढेल यावर  सर्वांचे एकमत झाले.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व संपादक यांना ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या प्रती देऊन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

०००

हेमंतकुमार चव्हाण/ससं/

 

ताज्या बातम्या

राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान  गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

0
मुंबई, २५ : २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात...

दिवंगत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
मुंबई, दि. 25: देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालय येथे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखत

0
मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'मौखिक आरोग्य आणि खबरदारी' या विषयावर ठाणे जिल्हा, शासकीय रूग्णालयाच्या, दंत शल्यचिकित्सक डॉ....

दिवंगत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्ताकडून आदरांजली

0
नागपूर, दि. 25 :  दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली...

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली

0
नागपूर, दि. 25 :  दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी, नागपूर येथील शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...