Wednesday, December 25, 2024
Home Blog Page 11

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

नागपूर, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव तसेच गृह विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा), आपले सरकार, महाराष्ट्र राज्य पोलीस, बृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र शासन, मोटार वाहन विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर) पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, महाराष्ट्र सुरक्षा दल, मुंबई वाहतूक पोलीस, एनजेडीजी | राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड, देशाच्या सेवेत भारतीय पोलीस, राष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टल, ई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

0000

राज्यात सुरु असलेल्या, प्रस्तावित प्रकल्पांना ‘एडीबी’ने मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरदि. 17 : राज्याच्या सर्वांगीणसर्वसमावेशक आणि गतिमान विकासासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशनच्या (MITRA ‘मित्रा’) माध्यमातून आरोग्यग्रामीण रस्ते वाहतूककौशल्य विकास आणि बांबू प्रकल्प या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी राज्यात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने (ADB) मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला केले आहे. एडीबीच्या संचालक मिओ ओका यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवन परिसरातील मंत्रिमंडळ सभागृहात आशियाई विकास बँकेसंदर्भातील विविध विषयांबाबत बैठक झाली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्याच्या विकासासाठी ग्रामीण भागाचा वेगाने विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील सर्व गावे विकसित भागाशी जोडण्यात यावीत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरणविषय-शाखांची संख्या वाढविणे आदी माध्यमातून अतिरिक्त 75 हजार जागा वाढविण्यात याव्यात. नागरिकांच्या आरोग्यावर अधिकाधिक भर देतानाच गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील उपचारांवर भर देण्यात यावा. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचालसीचा उपयोग करावाअसे निर्देशही त्यांनी यावेळी सचिवांना दिले.

बांबू लागवड अभियानातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करण्याबरोबरच जंगल क्षेत्रामध्ये वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात. त्यासाठी रोपवाटिकांमध्ये बांबू रोपे उपलब्ध करून द्यावीत. मराठवाड्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करून जंगल क्षेत्रामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करावा. राज्यातील महत्त्वाकांक्षी अभियानांना गती देण्यासाठी मुख्य सचिवांनी प्रमाणित प्रक्रिया (एसओपी) ठरवून द्यावी. अभियानाचा कालावधीसंबंधितांच्या जबाबदाऱ्या याबाबत स्पष्टता ठेवावीअशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ‘मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, ‘एडीबीच्या संचालक मिओ ओकावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरनियोजन-महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरामुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेग्रामविकासचे प्रधान सचिव एकनाथ डवलेवने विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीपर्यावरणचे प्रधान सचिव प्रवीण दराडेमुख्यमंत्र्यांचे सचिव सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह एडीबीचे विविध विषयतज्ज्ञ उपस्थित होते.

0000

संतोष तोडकर/विसंअ/

 

कृत्रिम बुध्दिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे उद्या व्याख्यान

नागपूर, दि. १७ : कृत्रिम बुध्दिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांचे उद्या बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रेस क्लब येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्रेस क्लब ऑफ नागपूर व संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेमध्ये होत असलेल्या कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व माजी राज्य माहिती आयुक्त श्री. राहुल पांडे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लब ऑफ नागपुरचे अध्यक्ष श्री. प्रदीप मैत्र तसेच नागपूर व अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी केले आहे.

00000

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

नागपूर, दि. 17 – राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अऩावरण करण्यात आले.

विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.

आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणी,  गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे,  पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती, पशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे.  सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.

00000

 

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार; नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

नागपूर, दि. १७ नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलरअर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्यासंदर्भातील करार करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, विविध विभागांचे सचिव, आशियाई विकास बँकेचे विविध विषयतज्ज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक (एसपी) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.

0000

संतोष तोडकर/विसंअ/

 

 

 

 

करदात्याप्रती सहृदयता जपत सक्षम व पारदर्शीपणे काम करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर, दि. १७ :  करदात्यांकडून कररूपात मिळणारा पैसा हा त्यांच्यासाठीच आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा निर्मितीसाठी वापरात येतो. हा संदेश विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत सकारात्मक पद्धतीने पोहोचविण्याची गरज आहे. आयकर अधिकाऱ्यांनीही करदात्या प्रती सह्रदयता जपत सक्षम व पारदर्शिपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य हरिंदर बीर सिंग गिल, प्रधान महानिदेशक (प्रशिक्षण) संजय बहादुर, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे महानिदेशक (प्रशिक्षण) पी. सेलवा गणेश, अपर महानिदेशक (प्रशासन) मुनीष कुमार, अपर महानिदेशक शिदारामप्पा कपटनवार, अप्पर महानिर्देशक  आकाश देवांगन, अपर महानिदेशक अंकुर आलिया,  प्रशिक्षणार्थी आयकर अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, उत्कृष्ट प्रशासक म्हणून घडविणारे हे प्रशिक्षण या तुकडीला परिपूर्ण करणार आहे. हे प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात राष्ट्रीय कर अकादमी महत्वाची भूमिका पार पाडेल.  करदात्यांसोबत योग्य व्यवहार करुन करसंकलन करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल. आपले कर्तव्य बजावताना आदर्श परिमाणांसोबत तडजोड न  करता नैतिकता व सदाचाराचे पालन करुन या पदाला योग्य न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी  केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने आपली गौरवशाली परंपरेची जोपासना करुन अधिकाधिक  प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे.  यावर्षीची ७८ वी तुकडी प्रशिक्षित होत आहे, हे अभिमानास्पद आहे. २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आपण पूर्णत्वास नेणार आहोत. त्या करता त्यांचाही मोलाचा वाटा आणि सहभाग असणार आहे, असा आशावादही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी, अकादमीचे अंकुर आलीया यांनी ७८ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी विषयी माहिती दिली. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

१६ महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण

नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी  ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी (आयकर) सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षांद्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. थेट भरती झालेले हे अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यापूर्वी एनएडीटी, नागपूर येथे  १६ महिन्यांचे  सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण करतात.

१४५ अधिकारी प्रशिक्षणार्थी

७८ व्या तुकडीच्या नवीन बॅचमध्ये रॉयल भूतान सर्व्हिसच्या २ अधिकाऱ्यांसह १४५ अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत. राष्ट्राच्या विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मानसिकतेसह हे प्रशिक्षण सुसज्ज करते. इंडक्शन ट्रेनिंगची प्रशिक्षण पद्धत विकसित भारत या संकल्पनेवर आधारित आहे. अधिकाऱ्यांमध्ये उत्कृष्टता, उत्तरदायित्व आणि नवोपक्रमाची संस्कृती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते . कार्यक्रमात वर्ग सत्रे, व्यायाम, केस स्टडी आणि परस्पर चर्चा यांचे मिश्रण समाविष्ट आहे, ज्यामध्ये कर प्रशासन, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेच्या विविध पैलूंचा समावेश आहे.

00000

विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. 17 (शिबिर कार्यालय) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर

नागपूर, दि. १७ : विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली.

विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य सर्वश्री विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम, दिलीप सोपल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.

०००

माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना विधानसभेत श्रद्धांजली

नागपूर, दि. १७:  विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री दत्तात्रय महादेव राणे यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत माजी सदस्य दत्तात्रय राणे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला.

०००

खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूरकरांना देशभरातील कलावंतांना अनुभवण्याची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.१६ : खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला तसेच अनुभवण्याची संधी दिली. महोत्सवाची ही पर्वणी अशीच लाभत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज खासदार सांस्कृतिक महोत्सवास भेट दिली. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, आ.मंजुळा गावित, आ.अमित गोरखे, माजी आमदार अनिल सोले, दैनिक हितवादचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, उद्योजक यशपाल आर्य, पदमेश गुप्ता, यशपाल गुप्ता आदी उपस्थित होते.

देशभरातीलच नाही तर आपल्या भागातील कलावंतांसाठी देखील खासदार सांस्कृतिक महोत्सव मोठे व्यासपीठ, दालन ठरले आहे. महोत्सवातील वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धांमधून नागपूरचे सांस्कृतिक क्षेत्र उजळून निघेल. या महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजन समितीचे आभार मानतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरातील हा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे, त्याचा विशेष आनंद असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

महोत्सवातील कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात. हा महोत्सव नागपूरकरांच्या जीवनाचा अंग झाला आहे. कुमार विश्वास यांच्यासारख्या लेखक, कवी, विचारवंताच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. कुमार विश्वास उपस्थितांना मंत्रमुग्ध करतात. ते केवळ तत्वच सांगत नाही तर तात्विकतेने जगत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमासदेखील मुख्यमंत्री श्री.फडणवीस उपस्थित राहिले.

खासदार महोत्सवातून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. मनोरंजनातून सांस्कृतिक अभिरुची, लोकप्रबोधन, लोकसंस्कार  होत आहेत. महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य, समर्थन लाभते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून काम करावे – मराठी भाषा मंत्री उदय...

0
पुणे, दि. २४: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे...

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाची आढावा बैठक संपन्न

0
पुणे, दि. २४: उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले....

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
प्रतिकुल परिस्थितीत लोकसेवेचा दीप ताईंनी तेवत ठेवला - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर दि 24:- अत्यंत आव्हानात्मक अशा काळात सुमतीताईंनी खूप संघर्ष केला. अनेक लोकआंदोलने केली. त्यांच्या...

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतले बिरोबा देवाचे दर्शन

0
सांगली, दि. 24 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.‌राम शिंदे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे बिरोबा देवाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती...

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांची अपशिंगे (मिलिटरी) गावाला भेट

0
सातारा, दि. २४ : अपशिंगे (मिलिटरी) गावाला मोठी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात गावातील ४६ जवान शहीद झाले होते. आताही या गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य...