Sunday, December 22, 2024
Home Blog Page 1361

राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मतदानाचा हक्क बजावण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन

मुंबई, दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर श्री. सिंह यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत राज्यातील तयारीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.        

श्री. बलदेव सिंह म्हणाले, राज्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

8 कोटी 94 लाख मतदार

राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप यादीत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले.

मतदान केंद्रांत वाढ

श्री. सिंह म्हणाले, सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये 5325 मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण 96 हजार 654 मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाच हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रे खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी pwd app ची सुविधा देण्यात आली आहे.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट, 1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

मतदान टक्केवारी

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राज्यात 50.67 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचारी सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही श्री. सिंह यांनी सांगितले.

मतदार जनजागृती

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (ईव्हीएम) सुरक्षितता आदींबद्दल मतदारांना माहिती देण्यात येत आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशीनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी 6.30 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली आहे.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल,सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास नागरिकांना सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/21.9.2019

दिलीप शिंदे लिखित ‘निवडणूक कायदेविषयक’ पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 19 : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रियाया पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे (भा.प्र.से.) हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा, वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना, उमेश सिन्हा, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मुंबईत राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला श्री. अरोरा यांची प्रस्तावना असून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे पुस्तक ग्रंथालीप्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच राजकीय कार्यकर्ते ते सर्वसामान्य मतदार अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात निवडणूक आयोगाची माहिती, मतदार नोंदणी प्रक्रिया आणि ओळखपत्रे, उमेदवारांची पात्रता, शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरणास बंदी, आचारसंहिता, निवडणूक विषय गुन्हे, राजकारणातील गुन्हेगारीस प्रतिबंध, प्रशासकीय यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम), टपाली मतदान, कायद्यातील नव्या सुधारणा, पेड न्यूज, उमेदवारांसाठी एक खिडकी योजना आणि मतदान जागृती कार्यक्रम याबाबत सविस्तर आणि सचित्र माहिती समाविष्ट आहे.

000

मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 19 : मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले.

राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. अरोरा यांच्यासह भारत निवडणूक आयोगाचे अन्य निवडणूक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी येथे आले होते. सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी विविध बैठका घेतल्या.  त्यानंतर राज्यात लोकसभा निवडणुकीत राबविलेल्या विशेष उपक्रमांवर आधारित आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या’पारदर्शक, सुरक्षित, उत्साहीया नावाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसभा निवडणुकीमध्ये राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची उत्कृष्ट छायाचित्रे आणि माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. यावेळी मतदार जागृती वाहनाचे तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅनचे झेंडी दाखवून उद्घाटन केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष पोस्ट तिकिट आणि टपाल आवरणाचे (कव्हर) प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनित मतदार जागृती चित्रफितीचे उद्धाटनही याप्रसंगी करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, महाराष्ट्र परिमंडळाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर आदी उपस्थित होते.

0000

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि.19.9.2019

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

विधानसभा निवडणूक-२०१९ च्या पूर्वतयारीचा भारत निवडणूक आयोगाने घेतला आढावा

मुंबई, दि. 19: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने करतानाच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा आणि भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी कालपासून मुंबईत आले होते. आज सायंकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी या बैठकांबाबत तसेच राज्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली.

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्राचे काम उल्लेखनीय झाले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूकदेखील मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडेल असा विश्वास श्री. अरोरा यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सुमारे 61 टक्के मतदान झाले होते. ते देशाच्या सुमारे 67 टक्के इतक्या सरासरीपेक्षा कमी होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना राज्यातील निवडणूक यंत्रणेला दिल्या आहेत.‍

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 18 ते 35 वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असून मतदार जागृतीच्या कार्यक्रमाला (स्वीप) अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात विविध पक्षांच्या सुमारे 1 लाख 28 हजार 216 इतक्या बूथ लेव्हल एजन्टची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी हे कार्यकर्ते निवडणूक यंत्रणेला मदत करतील. 

मतदान केंद्राच्या ठिकाणी वीज, पाणी आदी आवश्यक त्या सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा पुरविण्याबाबत तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आयोगाने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांच्यासह निवडणुकीसाठीच्या विविध यंत्रणांचे राज्यस्तरावरील प्रमुख अधिकारी, राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला. त्या अनुषंगाने श्री. अरोरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, आगामी निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 4 हजार 500 मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याबाबत राज्याने विशेष काम केले आहे. काही राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती.‍ तथापि, सध्यातरी यामध्ये वाढ होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएम यंत्रे अत्यंत सुरक्षित असून त्यामध्ये कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाद्वारे छेडखानी करता येऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी मतपत्रिकांद्वारे मतदान हा मुद्दा जुना झाला असल्याचे सांगून येणारी निवडणूक मतदान यंत्राद्वारेच होणार हे ठामपणे स्पष्ट केले.

निवडणुकीच्या तारखा निश्चित करताना शाळांच्या सुट्ट्या, परीक्षा तसेच सर्व धर्मांचे महत्त्वाचे सण विचारात घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेतील तरतुदीनुसार कोल्हापूर, सांगलीमधील पुरामुळे बाधित लोकांच्या सुरू असलेल्या पुनर्वसन कार्यावर ‍परिणाम होणार नाही. तथापि, या अनुषंगाने अधिकची काही तरतूद करण्याबाबत मागणी केली गेल्यास त्याबाबत सहानुभूतीने विचार केला जाईल.

यावेळी श्री. सिन्हा यांनी निवडणुकीसाठी जिल्हास्तरावरील यंत्रणेची तरतूद, ईव्हीएम- व्हीव्हीपॅटची पुरेशी उपलब्धता, कायदा आणि सुरक्षा व्यवस्था,‍ उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवणे, मतदान केंद्रावर सीसीटीव्ही, मतदार यादी अचूक करण्यासाठीचे प्रयत्न, संवेदनशील भागात सुरक्षेची विशेष व्यवस्था, सुविधा,‍ सी-‍ व्हिजील ॲप आदींबाबत माहिती दिली.

यावेळी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर विशेष पुरस्कार

0
रायपूर, दि. 22 : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण लोकसभेचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार साय व छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय...

विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई दि.22- मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत

0
अहिल्यानगर : दि.२२- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधानपरिषद सभापती...

धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २२: परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश...

राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपाची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि.२२ : - राज्य  मंत्रिमंडळाचे खातेवाटप २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र...