रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1606

महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी येथे सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार – विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती

मुंबई, दि. 14 : महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या अनुयायी जनतेला प्रशासनातर्फे सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी आज दिली.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतात. त्या ठिकाणी पुरवावयाच्या सोयी-सुविधांबाबत आढावा घेण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. दौंड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ -5 च्या पोलीस उपायुक्त नियती ठाकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, परिसरातील स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था, चैत्यभूमीशेजारील समुद्रावर अधिकची सागरी जीवरक्षक नौकांची व्यवस्था करणे, आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी या अनुषंगाने श्री. दौंड यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात यावे, मार्गावर सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था करण्यात यावी तसेच रेल्वे विभागाने या दिवशी रेल्वेसेवा सुरळीत चालविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शिवाजी पार्क येथे अनुयायींना भोजनासाठी व्यवस्था दरवर्षीप्रमाणे करण्याबरोबरच चैत्यभूमीकडे येणाऱ्या रस्त्यांच्या प्रारंभी पर्यायी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आल्यास शिवाजी पार्क येथील व्यवस्थेवर ताण येणार नाही याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सांगण्यात आले. राज्यातून मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असल्यामुळे एसटीने दरवर्षीप्रमाणे अधिकच्या बसेस सोडाव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या.

बोरीवली येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडाला कमी शुल्कात भेट देण्याची संधी भीम अनुयायींना मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी केली. बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, बेस्ट, वाहतूक विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक न्याय विभाग, तटरक्षक दल, रेल्वे आदी विभागांचे अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे  पदाधिकारी उपस्थित होते.  

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.14.11.2019

निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता

संयुक्त खाते नसल्यास स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य

मुंबई, दि.14 : निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत त्याला किंवा तिला मासिक निवृत्तीवेतनाची रक्कम प्रदान करण्यात येते.

निवृत्तीवेतनधारकांच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास स्वतंत्र निवृत्तीवेतन खाते उघडावे लागत असे. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला नवीन बँक खाते उघडण्याची गरज नाही. त्यांना आवश्यक त्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून योग्य त्या कार्यवाहीनंतर त्यांच्या पूर्वीच्या संयुक्त खात्याद्वारेच कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येईल. यासंबंधीचा शासन निर्णय वित्त विभागाने 14 नोव्हेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे.

परंतु ज्या प्रकरणात निवृत्तीवेतनधारकाने संयुक्त बँक खाते उघडलेले नसेल त्या प्रकरणी कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201911141536341105 असा आहे.

पु. ल. कला महोत्सवामध्ये स.न.वि.वि. उपक्रमात सुरुवात

मुंबई, दि. 14 : बालदिनाचे औचित्य साधून पु. ल. कला महोत्सव 2019 मध्ये सप्रेम नमस्कार विनंती विशेष या विशेष उपक्रमाची सुरुवात होणार आहे. लोप पावत चाललेल्या पत्रलेखन संस्कृतीचे संवर्धन व वहन व्हावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मोबाईल व इंटरनेटच्या या काळात“पत्रलेखनातून व्यक्त होणे”ही भावना जवळ जवळ लुप्त झाली आहे. लहान मुलांना तर पत्रलेखन म्हणजे फक्त परीक्षेपुरतेच माहित आहे. विविध समाजमाध्यमे व मोबाईल हेच संपर्काचे साधन आहे, अशी भावना लहान  मुलांमध्ये दृढ झालेली आहे.

मुलांमध्ये लेखन व वाचन वाढावे हा दृष्टीकोन समोर ठेवून पु. ल. कला महोत्सवामध्ये येणाऱ्या लहान मुलांना पोस्टकार्डचे वाटप करण्यात येणार आहे. पोस्टकार्ड मिळालेल्या मुलाने त्याच्या जवळच्या कोणत्याही एका व्यक्तीला पत्र लिहिणे अपेक्षित आहे. ज्या व्यक्तीला हे पत्र लिहिले जाईल त्या व्यक्तीने पुढे त्याच्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावे असे अभिप्रेत आहे. यामुळे समाजमाध्यमाशिवाय इतरही काही चांगली संपर्काची साधने आहेत हे मुलांच्या लक्षात येईल व लोप पावत चाललेल्या पत्र संस्कृतीचे संवर्धन होईल ही अपेक्षा आहे. दि. 15 नोव्हेंबर रोजी पु. ल. अकादमीमध्ये येणाऱ्या प्रत्येकास (प्रौढ व बालके) एकेक पोस्टकार्ड/आंतरदेशीय कार्ड देवून पत्र लिहिण्यास उद्युक्त करण्याचा उपक्रम होणार आहे.  

वाहनांच्या वर्गानुसार वेग मर्यादा निश्चित

मुंबई, दि. १४ : सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती यांनी रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्युंमध्ये दरवर्षी १० टक्के घट करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार देशातील विविध रस्त्यांकरिता वाहनांच्या वर्गानुरूप महत्तम वेग मर्यादा निश्चित केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील रस्त्‍ो अपघातांचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की, सुमारे ३० टक्के प्राणांतिक अपघात हे वाहनचालक यांनी भरधाव वेगाने वाहन चालविल्याने होतात. महाराष्ट्र राज्यातील विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाटरस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते आणि रस्त्याचा चढ-उतार या बाबींचा सांगोपांग विचार करून प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी वाहनांच्या वर्गानुसार महत्तम वेग मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे.

ज्या वळण रस्त्याची त्रिज्या ५० मीटरपेक्षा कमी आहे अशा सर्व रस्त्यांवर वाहनांचा वेग ताशी ३० कि.मी. निश्चित करण्यात येत आहे. सर्व रस्त्यांवरील बोगद्यामध्ये वेग मर्यादा ताशी ८० कि.मी निश्चित करण्यात येत आहे. नियम ११८, केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये नमूद केल्यानुसार परिवहन संवर्गातील वाहनांना वेग नियंत्रकाच्या अटी लागू राहतील. यासंदर्भातील अधिक माहिती https://highwaypolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ही अधिसूचना दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. असे अपर पोलीस महासंचालक(वाहतूक), मुंबई यांनी कळविले आहे.

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर उद्या मुलाखत

मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर पत्रकार व लेखक चंद्रशेखर कुलकर्णी व पुलंचे साहित्य (वेबसाईट) संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या वेब ‍डेव्हलपर स्मिता मनोहर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल.

तसेच ही मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही सोमवार दि.18, मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.बहुआयामी पु.ल.देशपांडे,गीतकार,संगीतकार,लेखक,नाटककार आणि कलाकार अशा सर्वप्रकारे पु.ल.देशपांडे यांचे कलेशी असलेले नाते, मला भावलेले पु.ल.देशपांडे, puldeshpande.net ही पुलंना समर्पित पहिली मराठी भाषेमधील वेबसाईट, या वेबसाईटचे स्वरूप, पु.लं चे सर्व साहित्य आपण डिजिटल स्वरूपात आणताना करावे लागलेले प्रयत्न या वेबसाईटला मिळालेला प्रतिसाद याविषयी सविस्तर माहिती श्री. कुलकर्णी व श्रीमती मनोहर यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

‘हिमालयाची सावली’ने उद्या पु. ल. कला महोत्सवाचा होणार समारोप

मुंबई, दि. 14 : दि. 8 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या ‘पु. ल. कला महोत्सव 2019’ चा समारोप उद्या दि. 15नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव व सिद्धार्थ जाधव प्रमुख पाहुणे आहेत. पु. ल. कला महोत्सव2019 अंतर्गत विविध कला आविष्कारांवर आधारित दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला अनेक रसिकांनी भेटी दिल्या. अभंग रिपोस्ट या पारंपरिक शास्त्रीयरॉक संगीत पद्धतीवर झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन झाले होते तर समारोप हिमालयाची सावली या नाटकाने होणार आहे. या महोत्सवामध्ये कुसुम मनोहर लेले हे नाटक, इला भाटेंची ‘पै पैशाची गोष्ट’, सलील कुलकर्णी यांचा ‘बाकीबाब आणि मी’, संदीप खरे, शेखर जोशी, सावनी शेंडेचा ‘इर्षाद’, मेघा घाडगेचा लावणीचा कार्यक्रम, रेश्मा कारखानीसांची कविता, साहित्य संघाचे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’, ग्रेस यांच्यावर बेतलेली कलाकृती ‘कवी जातो तेव्हा’, ‘काजव्यांचा गाव’, ‘गुगलीफाय’ नाटक, ‘लाली’ एकांकिका, देवानंद माळी यांचा लोककला कार्यक्रम, अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे नाट्य सादरीकरण, लहान मुलांसाठीचे कार्यक्रम व कार्यशाळा या व अशा अनेक कलाकृतींना प्रेक्षकांनी अक्षरशः भरभरून प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक घटकांचे संवर्धन होण्यासाठी अकादमीतर्फे निर्माण केलेल्या ‘महाकला’ या वेबसाईटचे उद्घाटनही होणार आहे. रोषणाईने उजळून निघालेल्या पु. ल. अकादमीस गेले आठ दिवस वेगळेच स्वरूप प्राप्त झालेले आहे. यापुढेही अकादमीच्या माध्यमातून अशाच दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण व्हावे, अशी अपेक्षा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.

दि. 15 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्यमंदिरामध्ये संपन्न होणाऱ्या या समारोप कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.

वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यसभेचे सदस्य शरद पवार, महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, श्रीमती मेघना तळेकर, राजेश तारवी, नागनाथ थिटे, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह ८ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी

सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर

मुंबई, दि. 13 : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.

बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकीता पांडे, महानगरपालिकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव श्री.जाधव तसेच महानगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.

प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना 2007 पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महानगरपालिकांना सोडतीतून वगळण्यात आले. तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.

विविध प्रवर्ग आणि त्यासाठी महापौरपदे आरक्षित झालेल्या महापालिका पुढीलप्रमाणे आहेत.

· अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : वसई- विरार

· अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : मीरा- भाईंदर

· अनुसूचित जाती (महिला) : अहमदनगर, परभणी.

· नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, धुळे, अमरावती

· नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : नांदेड-वाघाळा, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव

· खुला (सर्वसाधारण) : बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर

· खुला (महिला) : नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर. 0000

Draw declared for 27 mayors of Municipality Corporation

Eight municipality mayor seats reserved for open category

Including Bruhn Mumbai, Pune, Nagpur, Thane, and Nashik

Mumbai, date.13th: Draw for mayors of 27-municipality Corporation was declared today under the presidency of Manisha Mhaiskar- Patankar, Principal Secretary of Urban Development Department.

Mayor of Brihanmumbai Vishvnath Mahadeshwar, mayors, Deputy Mayor, office bearers of other municipalities, Assistant Secretary of Urban Development Department Pandurang Jadhav, Upper Secretary Sachin Sahastrabudhhe, Unit Officer Nikita Pande and municipality officers were present at the event.   Mayor, Assistant Secretary Shri. Jadhav and municipality officers drew the chits and declared the reserved seats of the mayor.  Female office bearers drew chits for women category reservation.

Provisions of draw reservations were explained at the beginning of the programme. The draw was declared according the Reservation Act 2017.  Municipalities reserved for ST tribe since 2007 were excluded while drawing chits for ST reservation. In addition, while drawing chits for other categories, municipalities that hold reservation for same category were excluded and chits were drawn for other municipalities.

Following are the details of various categories and municipalities for which mayor posts are reserved-

ST (General): Vasai- Virar

SC (General): Mira- Bhayander

SC (Women): Ahmednagar, Parbhani

Citizen’s Backward Category (General): Latur, Dhule, Amravati

Citizen’s Backward Category (Women): Nanded- Waghala, Solapur, Kolhapur, Malegaon

Open (General): Brihanmumbai, Pune, Nagpur, Thane, Nashik, Kalyan-Dombivali, Sangli, Ulhasnagar

Open (Women): New Mumbai, Jalgaon, Bhiwandi, Akola, Panvel, Pimpri-Chinchwad, Aurangabad, Chandrapur

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता’

उद्या होणार महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 14 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. “व्यवसाय सुलभता”(इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा “महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता” साकारली आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते उद्या 14 नोव्हेंबरला या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन होणार आहे.

प्रगती मैदान येथे दि.14 ते 27 नोव्हेंबर 2019 या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने 39 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचेआयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने “व्यवसाय सुलभतेच्या” माध्यमातून राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांचे 8 आणि बचतगटांचे 2 असे एकूण 10 स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत.‘इज ऑफ डुईंग बिजनेसच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी यंदा राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 3 वाजता प्रगती मैदान येथील हॉल क्रमांक 12 –मध्ये होणार आहे.

20 नोव्हेंबर रोजी साजरा होणारमहाराष्ट्र दिन 

व्यापार उद्येागासह या मेळाव्यात सहभागी विविध देश आणि राज्यांच्यावतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. याअंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रगती मैदान येथील‘हंसध्वनी रंगमंचयेथे महाराष्ट्र दिनसाजरा होणार आहे. मुंबई येथील पृथ्वी इनोव्हेशन्स ग्रुपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून या माध्यमातून व्यापार मेळ्यास भेट देणाऱ्या देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर मुलाखत

मुंबई, दि.13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात युनिसेफचे राज्य समन्वयक विकास सावंत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार, दि. १४ आणि शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

युनिसेफतर्फे १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश, बालहक्क म्हणजे काय, बालकांची सद्य:स्थिती, जनजागृती मोहिमेची उद्दिष्टे, बालकांचे हक्क व सुरक्षिततेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, सप्ताहादरम्यान करण्यात येणारी जनजागृती,  बालकांना सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित कसे करता येईल, बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत घटक आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.सावंत यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...