रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1616

नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांची मुंबईतील टिनी मिरॅकल्सला भेट

मुंबई, दि.16 : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांच्या भारत भेटी अंतर्गत मुंबईतील पहिल्या कार्यक्रमात शाही दांपत्याने आज टिनी मिरॅकल्सला भेट दिली. टिनी मिरॅकल्सही संस्था डच उद्योजक लॉरेन मेटर यांनी स्थापन केलेली आहे.

डच विदेश व्यापार आणि विकास सहकार मंत्री सिग्रीड काग यांच्यासोबत शाही दांपत्य टिनी मिरॅकल्स, मुंबई येथे पोहोचले असता टिनी मिरॅकल्सचे संस्थापक लॉरेन मेटर व संचालिका श्रीमती ग्रेस जोसेफ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी प्रथम परदेशी महिलानिर्मित उत्पादनांचे विशेष प्रदर्शन पाहिले. त्यानंतर प्रत्यक्षात उत्पादने तयार केली जातात, ते शिक्षण-प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी गेले. त्यांनतर शाही दांपत्याने इथे काही महिलांशी चर्चा केली व काही डच डिझाइन उत्पादने स्वतः बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, त्यांनी जवळपासच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला, जेथे टिनी मिरॅकल्ससाठी काम करणाऱ्या महिलांची मुले शाळेत जातात. टिनी मिरॅकल्सच्या महिला कामगारांसोबत एक फोटो काढून या भेटीची सांगता झाली. 

टिनी मिरॅकल्सचे संस्थापक लॉरेन मेटर म्हणाले,“जगातील दारिद्र्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो यावर मॅजेस्टी किंग विलेम-अलेक्झांडर व क्वीन मेक्सिमा यांच्याशी चर्चा करण्याची व मते मांडण्याची मिळालेली संधी हा आमच्यासाठी एक बहुमानच आहे.”

भारत भेट

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निमंत्रणाला मान देत महामहिम राजे विलेम-अलेक्झांडर आणि क्वीन मेक्सिमा भारत भेटीसाठी आले आहेत. दिनांक १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ते भारत भेटीवर आहेत व यात नवी दिल्ली, मुंबई आणि केरळ राज्यांचा समावेश आहे. भारत आणि नेदरलँड्समधील जुने संबंध घनिष्ठ करणे हा या भारत भेटीमागील उद्देश आहे. या भेटीमध्ये जल तंत्रज्ञान, सागरी विकास, आरोग्य सेवा, शाश्वत शेती, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक वारसा यासारख्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री स्टेफ ब्लोक (ज्यांचे गुरुवारी आगमन होईल) आणि परराष्ट्र व्यापार व विकास सहकार मंत्री सिग्रीड काग हे कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार शाही दांपत्याच्या सोबत असतील. ह्या भारत भेट दौऱ्यामध्ये एक समांतर व व्यापक व्यापार अभियानदेखील समाविष्ट आहे, ज्यात दोन्ही देशांमधील भविष्यकालीन आर्थिक भागीदारीच्या संभाव्य शक्यतांचा शोध घेण्यात येईल. तसेच आरोग्यसेवा मंत्री ब्रुनो ब्रुइन्स व आर्थिक व्यवहार व हवामान धोरण राज्य सचिव मोना केइझर हेदेखील या भेट दौऱ्यात असणार आहेत.

शाही दांपत्य राजा विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांचे रविवारी (१३ ऑक्टोबर) रोजी दिल्लीत आगमन झाले. शाही दांपत्याने सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे स्वागत केले.

मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेसाठी ६ जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थांची निवड

मुंबई दि. 16: राज्यातील अल्पसंख्याक समूहातील उमेदवारांकरिता विविध स्पर्धा परीक्षा, सामाईक प्रवेश परीक्षा  आणि इयत्ता दहावी बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीसाठी मोफत प्रशिक्षण देण्याकरिता मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी निवड केलेल्या संस्थेकडे आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  या योजनेअंतर्गत सन 2019-20 करिता मुंबई शहर जिल्ह्यातील प्रबोधन बहुउद्देशीय शिक्षण संस्था, एम.टी.एज्युकेअर लिमिटेड, सिद्दीकी एज्यूकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट या संस्थांची अभ्यासक्रमनिहाय निवड करण्यात आली आहे.

राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे. केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बँकिंग सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता 10वी 12वी अनुत्तीर्ण अल्पसंख्याक उमेदवारांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय सेथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

७ ते १३ जानेवारीदरम्यान होणार राज्य कला प्रदर्शन

मुंबई, दि. 16 : कला संचालनालयामार्फत 60 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन 7 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन कला संचालनालयाच्या व्यावसायिक कलाकार विभागामार्फत भरविण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शनात बक्षीसपात्र कलाकृतींना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत.

इच्छुक कलावंतांनी दिनांक 5 आणि 6 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत या कालावधीत कला संचालनालयाचे सर ज.जी. कला दालन, कला शाळा आवार, डॉ. दा.नौ. मार्ग, मुंबई 400001 येथे आपल्या कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन प्रभारी कला संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

१८ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

मुंबई, दि. 16 : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २०दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार

मुंबई, दि. 16 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.

लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क – श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली 110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/16.10.2019

निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई

मुंबई, दि. 16 : विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

राज्यात दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण आयोजित करण्यास; तसेच वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसेच मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी 48 तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनियन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.16 ऑक्टोबर 2019

कै. बी. जी. देशमुख निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 16 : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निबंधाची प्रवेशिका दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

          

भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेकडून दरवर्षी कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार सन 2019- 2020 या वर्षाच्या निबंधस्पर्धेसाठी जल व्यवस्थापन’ (वॉटर मॅनेजमेंट) आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक असमानता लक्षात घेऊन राज्यातील पोषण स्थिती’ (द स्टेटस ऑफ न्युट्रिशन इन महाराष्ट्र कन्सिडरिंग रिजनल डिस्पॅरिटीज इन द स्टेट)  हे दोन विषय निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी पहिले पारितो‍षिक 7 हजार 500 रुपये,  दुसरे पारितोषिक 6 हजार रुपये, तिसरे 3 हजार 500 तर उत्तेजनार्थ 2 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

निबंध हा ठरवून दिलेल्या कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून आणि3 हजार ते 5 हजार शब्दमर्यादेत असावा. निबंध हा विषयानुसार विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर टोपणनाव लिहून चार प्रतीत सादर करावा. स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये.

निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. पारितोषिक देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्या वतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत पारितोषिक विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ पारितोषक प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असणार नाही.

निबंधावर टोपणनाव लिहून निबंधाच्या चार प्रती असलेला लिफाफा, टोपणनाव व त्याबाबतचे स्पर्धकाचे संपूर्ण नाव व पत्ता असलेला वेगळा लिफाफा एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा,  2019-2020 असे नमूद करावे व तो मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळमजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई 400032 या पत्त्यावर दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 22793430 किंवा 22024243/22854156 वर किंवा js.mrb-iipa@gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.16.10.2019

भारतीय अध्यात्मविचार म्हणजे सुखी जीवनाचा मूलमंत्र – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्तेकमिंग होम टू युवरसेल्फपुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 16 : तणावविरहित, लोकोपयोगी चांगले जीवन कसे जगावे याचे दिशादर्शन करणाऱ्या भारतीय अध्यात्मशास्त्राकडे आज जग आकर्षित झाले आहे. अध्यात्मशास्त्र सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारे असल्यामुळे ते जगापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मूळच्या अमेरिकन असलेल्या व सध्या ऋषिकेशच्या डिव्हाईन शक्ति फाउंडेशनच्या अध्यक्ष असलेल्या साध्वी भगवती सरस्वती यांनी लिहिलेल्या‘कमिंग होम टू युवरसेल्फया पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती, साध्वी भगवती सरस्वती, ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अभिनेत्री दिया मिर्झा, पार्श्वगायक कैलाश खेर, तालवादक शिवमणी, उद्योगपती अशोक हिंदुजा व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले,‘कमिंग होम टू युवरसेल्फहे पुस्तक म्हणजे स्वतःचा शोध आहे. हे केवळ पुस्तक नाही, तर जीवनाचे तत्व आणि मर्म आहे. साध्वी भगवती सरस्वती इंग्रजी भाषिक असल्या व त्यांचे पुस्तक इंग्रजी भाषेत असले, तरीही त्यातील तत्वज्ञान विशुद्ध भारतीय असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

कमिंग होम टू युवरसेल्फया संवादात्मक शैली असलेल्या पुस्तकामध्ये हॉलिवूड ते होली वूड’, ‘जीवनाचे इतिकर्तव्य’, ‘यश आणि अध्यात्मिक विकास’, ‘अध्यात्मिक मार्ग’, ‘नकारात्मक विचारांपासून मुक्ती’, ‘भीती आणि चिंतेतून मुक्ती’, या विषयांवर चिंतन केले असल्याचे साध्वी भगवती सरस्वती यांनी सांगितले.

शांती आपल्या स्वतःजवळच आहे. जगात कोठेही असलात तरी स्वतःच्या स्वरूपाशी जोडलेले राहा, असा संदेश चिदानंद सरस्वती यांनी दिला. यावेळी त्यांनी उपस्थितांना देश प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ दिली.   

मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन

मुंबई दि. 15:  आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन आणि लेखन करण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आज राजभवन येथे डॉ. कलाम यांना अभिवादन  करण्यात आले आणि त्यानंतर राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी काही कविता, गोष्टी, उतारे उपस्थितांना वाचून दाखवत अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. या कार्यक्रमास राजभवन येथील अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते, त्यांच्या कार्याला मनन आणि चिंतनाची भक्कम बैठक होती. आजच्या तरुणांनी वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक सकारात्मकतेचा संदेश देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वांनी वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करुया, असेही आवाहन राज्यपाल यांनी यावेळी केले.

000

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार

मुंबई, दि. 15 : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.

या निवडणुकीत एकूण3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

सर्व उमेदवारांची मतदारसंघनिहाय नावेwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...